घटस्थापनेने चंद्रपुरातील देवी महाकालीच्या यात्रेला सुरुवात

165

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. आज घटस्थापनेने चांदागडच्या आईची सुरू झालेली यात्रा भाविकांना आत्मिक समाधान देऊन गेली. माता महाकालीचा जयजयकार करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पुढील महिनाभरात चंद्रपुरात दाखल होणार आहेत.
Chandrapur mahakali mandir


चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज घटस्थापनेने प्रारंभ झाला. महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी पासून वैशाख पौर्णिमेपर्यंत चालते. या साधारण महिनाभरात चार राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरात देवी दर्शनासाठी दाखल होतात. चैत्र नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात. कोरोना काळात यात्रा बंद होती. यंदा सुरळीत झालेल्या यात्रेला देवीभक्तांची प्रचंड गर्दी उसळली.
नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेलाय. चंद्रपुरात उन्हाचा त्रास सुरू झाला आहे. त्यादृष्टीने मंडप आच्छादन, पेयजल, आरोग्य, निवास आदींसह मंदिर व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा केल्या आहेत. घटस्थापना आणि महाआरतीनंतर आज मंदिरात भाविकांच्या दर्शन प्रवेशाला सुरुवात झाली.

Mahakali mandir news
पहिल्या दिवशी रांगेत लागून प्रसन्न देवी दर्शन झाल्याने भाविक आनंदित झाले आहेत. सुविधा असेल तरी आणि नसेल तरी कुठलीही तक्रार न करता महाकाली मातेचे दर्शन घेत आपल्या वर्षभराच्या नियोजित संकल्पासाठी तिचा आशीर्वाद मागत ते स्वगावी मार्गस्थ होत आहेत.

राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या भाविकांना चंद्रपुरात पोहोचण्यासाठी एसटी प्रशासनाने सोय केली आहे. सर्व संकट निवारण करत देवी आपल्याला दर्शनासाठी बोलावते यावर भक्तांचा विश्वास आहे. पुढचे वर्ष तिच्या कृपाशीर्वादाने सर्व संकटं दूर होतील असा दृढ विश्वास भाविकांच्या मनात आहे.
bottom