कोण आहे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी?

महाराष्ट्र भूषण

6521

News34 chandrapur

मुंबई – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Maharashtra bhushan

या सोहळ्याला लाखो नागरिकांची उपस्थिती होती, एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी कोण, त्यांची या पुरस्कारासाठी निवड कशी झाली, त्यांचे लाखो अनुयायी, याविषयीचा हा आढावा.

अप्पासाहेब धर्माधिकारी हे थोर निरूपणकार कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे चिंरजीव होत. वडिलांकडून त्यांना निरूपणाचा वारसा लाभला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवले जातात. त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन अप्पासाहेबांना पद्मश्री सन्मानानेही गौरवण्यात आले. Padmashri Appasaheb Dharmadhikari

कै. नानासाहेब धर्माधिकारी यांनी यासाठी १९४३ साली श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक सुरू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला. या बैठकांमधून रामदास स्वामींच्या दासबोधाचे निरूपण केले जाऊ लागले. सोप्या शब्दांत अनुयायी किंवा श्री सदस्यांचे प्रबोधन होऊ लागले. विकारी मनाचे प्रबोधन करून निर्व्यसनी समाज घडविण्याचे काम सुरू झाले. आज देश-विदेशातील लाखो अनुयायी या बैठकांच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. या बैठकांमधून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पश्चात संत शिकवणीतून समाज प्रबोधनाचा हा वारसा अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे पुत्र सचिनदादा धर्माधिकारी यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

श्री समर्थ बैठकातून संत शिकवण देतानाच नैतिकता, निर्भयता, नम्रतेची शिकवण त्यांनी दिली. सामाजिक कार्याची व्यापकता वाढविण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जाऊ लागले. लोकसहभागातून हे उपक्रम राबविले जाऊ लागल्याने त्यांची व्याप्ती वाढत गेली.

हवामानातील बदल आणि त्याचे तापमानावर होणारे परिणाम लक्षात घेऊन वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करण्याचे कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने २०१५ ते २०२१ या कालावधीत एकूण ३६ लाख ६१ हजार ६११ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ३ लाख २१ मनुष्यबळ वापरण्यात आले. या वृक्षांची जोपासनाही श्री सदस्यांकडून केली जात आहे. आंतरिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवे, अशी शिकवण अप्पासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिली.

या शिकवणीतून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. रस्ते, नाले, गाळाने भरलेले तलाव, समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याचे कार्य श्री सदस्यांनी हाती घेतले. गावाच्या वेशीपासून सुरू झालेला हा उपक्रम हळुहळू शहरांच्या चौकाचौकांपर्यंत येऊन पोहोचला. प्रतिष्ठानच्या वतीने आत्तापर्यंत १४० स्वच्छता अभियाने राबविण्यात आली. २० लाख २३ हजार ३६९ श्री सदस्य सहभागी झाले. १ लाख १५ हजार २३ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या शिवाय विहिरीचे पुनर्भरण, जलस्रोतांची स्वच्छता, निर्माल्य संकलनातून खत निर्मितीचे उपक्रम राबविले आहेत. आध्यात्माला सामाजिक उपक्रमांची जोड दिल्याने लाखो अनुयायी त्यांच्या कार्यात जोडले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या अनुयायांपैकी एक आहेत.

अप्पासाहेबांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. माजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली होती. तर २०१७ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन सन्मानित केले. युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्युटने अप्पासाहेबांना लिव्हिंग लिजंड पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.

bottom