चंद्रपूर मनपा हद्दीत बांधकाम करतायं तर ह्या नियमाचे पालन करा

1369

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांनी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर केलेले नाही अशा ६ बांधकामधारकांची अनामत रक्कम महानगरपालिकेने जप्त केली आहे.

शहरातील भूगर्भाची पातळी खोलवर

शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने मानपमार्फत रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे.

पुरावे सादर न केल्याने कारवाई

परवानगीधारक बांधकामदारांना रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यासाठी यापुर्वी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता,  मात्र त्यांनी या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग केल्याचे पुरावे सादर न केल्याने तुकुम व वडगाव प्रभागातील प्रत्येकी १,भानापेठ व समाधी वॉर्डातील प्रत्येकी १ तर शास्त्रीनगर येथील २ अश्या एकुण ०६ बांधकाम परवानगी धारकांची अनामत रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

बोअरवेल धारकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक

शहरातील विहीर, बोअरवेल धारकांनाही रेन वॉटर हार्वेस्टींग करणे बंधनकारक असुन याकरीता त्यांना काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास २० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येणार असल्याने सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींग करून घ्यावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

नागरिकांना मिळेल पुरस्कार..

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीम राबविण्यात येत असुन याअंतर्गत जनजागृती करण्यास प्रत्येक वार्डात स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाद्वारे नेमले जात आहेत. जलमित्र म्हणुन काम करतांना त्यांच्या वॉर्ड मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. त्यांच्या प्रयत्नांनी १०१ घरी रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास प्लॅटीनम,५१ घरी केल्यास गोल्ड व २१ घरी हार्वेस्टींग केल्यास सिल्वर श्रेणीने पुरस्कृत केले जाणार आहे.जलमित्र म्हणुन काम करावयाचे असल्यास मनपा रेन वॉटर हार्वेस्टींग कक्ष किंवा ८३२९१६९७४३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

bottom