त्या वाघाला ठार मारण्याचे आदेश द्या – विजय वडेट्टीवार

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

733

News34 chandrapur

सावली – तालुक्यातील वाघोली बुटी येथे शेतात मका पिकाची पाहणी करण्यास गेलेल्या महिलेला वाघाने आपली शिकार बनवल्याची घटना आज (दि 20) च्या सकाळी 11 वाजता चे सुमारास घडली. प्रेमिला मुखरू रोहनकर (57) असे मृतक महिलेचे नाव आहे.

वाघ कुठं होता लपून?

सदर महिला ही नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळच्या सुमारास मका पिकाची पाहणी करिता गेली होती.  पिकामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर अचानक हल्ला करीत ठार केले. सदरची माहिती गावात पसरतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  24 दिवसात गावातील दोन महिला वाघांचे बळी ठरल्याने वाघोली बुट्टी येथील नागरीक आक्रमक झाले होते. वाघाच्या हल्ल्यात आणखी किती बळी जाणार? राज्याच्या वनमंत्र्यांनी यावर ठोस उपाययोजना करावी, वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर तणावाचे वातावरण

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे हे तातडीने घटनास्थळी हजर झाले तर उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर, ठाणेदार आशिष बोरकर व आदी कर्मचारी उपस्थित होते. नरभक्षक वाघास तात्काळ जेरबंद करू अशा आश्वासनानंतरच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला.
तालुक्यात मानव आणि वन्यप्राणी संघर्ष वाढीस लागला आहे. तालुक्यातील  बहुतेक परिसर हा जंगला लगत असल्याने वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे.  मागील जानेवारी 2022 ते मे 2023 पर्यंत वाघ, बिबट व रानडुकराच्या हल्ल्यात नऊ नागरिकांना आपले प्राण गमावे लागले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असून प्रशासन वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्यास अपयशी ठरत आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जात असली तरी घराचा कर्ता गमावल्याने कुटुंबावर किती आघात होत असेल याची जाणीव मात्र प्रशासनाला नाही काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्याचे वनमंत्री यांच्या जिल्ह्यातच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जात आहेत. मात्र ठोस उपाय योजना करण्यास वनमंत्री अपयशी ठरत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

वाघाला ठार करा – विजय वडेट्टीवार

जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्या अधिवासासाठी टेरेटरी कमी पडत आहे, आज जो हल्ला झाला तो हल्ला जंगल परिसरात झाला नाही, त्यामुळे वाघ आता गावात येत असल्याने अश्या धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने द्यावे अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
माणूस महत्वाचा आहे वाघ नाही, वाघाने ठार केल्यावर वनविभाग द्वारा देण्यात येणाऱ्या मदतीचे पैसे वाढवून काही उपयोग नाही, माणसांचे सरंक्षण कसे होणार..आज वाघ जंगल सोडून मानवी वस्तीमध्ये शिरकाव करीत आहे, उद्या हे प्रमाण वाढेल म्हणून आता अश्या वाघांना ठार करणे गरजेचे आहे.
bottom