चंद्रपुरात वाढते अपघात, प्रशासन “टक्केवारीत” खुश

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या घटना वाढल्या आहे, विशेषतः चंद्रपूर शहरात सातत्याने अपघात होत आहे, यामध्ये निष्पाप जीवांचे बळी जात आहे. मात्र प्रशासन कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाही, उलट मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाताची टक्केवारी घटल्याचे सांगून आरटीओसह संबधीत प्रशासन स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी शहरातील अतिक्रमण काढण्यास अन्य उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.

 

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, औद्योगिकीकरण असल्याने जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, वाहनांची संख्या जास्त असल्याने अपघातांचे प्रमाण ही जास्तच आहे, मागील काही दिवसांपासून महामार्गावर नव्हे तर शहरात अपघाताची मालिका सुरू झाली आहे, मागील आठवड्यात आठ वर्षीय बालकासह अपघातात 7 जणांना आपला जीव गमावला लागला, त्यापूर्वी एका शिक्षीकेसह अन्य नागरिकांना बळी गेला आहे. ही चिंताजनक बाब आहे, मात्र यावर आजही प्रशासनाने नियंत्रण आणलेले नाही. विशेष म्हणजे 27 ऑक्टोबर ला शहरातील रहमतनगर येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला, त्या मुलाचा अपघात पोलिसांच्या वाहनामुळेच झाला.

 

अपघाताबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली, त्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट वर्ष 2023 या कालावधीत 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांनी अपघातात आपला जीव गमावन्याचे शासन दरबार नोंद आहे.

या अपघातात दुचाकी अपघातांची संख्या 275 असून यामध्ये 129 जणांचा मृत्यू झाला, बैठकीत नियमाबद्दल चर्चा करण्यात आली होती मात्र ते नियम प्रत्यक्षात लागू झालेच नाही.
महामार्गावर अनेक अपघात होत असतात मात्र आता चंद्रपूर शहरात अपघातात वाढ झाली आहे.

 

4 सप्टेंबर 2023 ला चंद्रपुरातील बापट नगरमध्ये झालेल्या अपघातात शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला. त्याचदिवशी सायंकाळी 2 अपघातात दोघांनी आपला जीव गमावला. त्यांनतर ऑक्टोबर महिन्यात लागोपाठ झालेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 7 जणांनी आपला जीव गमावला, सतत होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहे. त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे.

 

अतिक्रमनात झपाट्याने वाढ

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी रस्त्यावर आपला कब्जा केला आहे, एरवी रस्त्याच्या कडेला सामान्य नागरिकांनि दुचाकी वाहन लावले तर तात्काळ वाहतूक विभाग वाहन उचलून नेतात. मात्र चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील असलेल्या दुचाकी वाहनांच्या शोरूमसह अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. एवढेच काय तर अर्धा अधिक रस्त्यावर नवीन दुचाकी, चारचाकी वाहने विक्रिसाठी ठेवल्या आहे. मात्र वाहतूक पोलिसांसह अन्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामागे आर्थिक कारण दडले असल्याचे बोलल्या जात आहे.
अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली मात्र कोणताही उपयोग झाला नाही.

प्रशासनाने स्वतः थोपटली आपली पाठ

मागच्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या कमी असून मृतकाचा आकडा सुद्धा कमी आहे, उलट 30 टक्के नागरिक यंदा वाचले, मृतकाच्या आकड्यात 30 टक्क्यांची कमी आली असे अधिकारी ताठ मानेने सांगत आहे, ही टक्केवारी कमी असली तरी निष्पाप नागरिकांचा बळी तर जात आहे ना?  मृतकाची संख्या 30 टक्क्यांनी कमी असली तर तो आकडा शून्यावर आणण्याची जबाबदारी कुणाची आहे? याचं भान अधिकाऱ्यांनी ठेवायला हवं. प्रशासन सध्या मागील वर्षीच्या तुलनेत “टक्केवारी” कमी झाल्याचे सांगून खुश असल्याचे दिसत आहे.

 

अधिकाऱ्यांचा संवेदनशीलपणा संपला

यंदा मृतक कमी आहे असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबांच्या घरी एकदा डोकावून बघावं.ज्यांच्या घरचा कमावता पुरुष दुचाकी अपघातात ठार झाला, एक आठ वर्षाचा मुलगा अपघातात गेला, 3 दिवसांनी त्याच्या वडिलांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला, यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याचं उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायलाच हवं.

कारवाई कुणावर?

शहरात अक्षरशः स्टंट करणारे दुचाकीस्वार यांच्यावर कारवाई अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. शहरात झालेल्या अपघाताला जबाबदार हे स्टंट करणारे दुचाकीस्वारचं आहे, मात्र हे वाहतूक पोलिसांच्या हाती कधी लागत नाही, आजही शहरात ट्रिपल सिट ने अल्पवयीन बालक प्रवास करतात, त्यांच्यावर कारवाई नाही, इतकेच नव्हे तर शहरात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी आहे? ट्रिपल सिट व स्टंट करणारे दुचाकी स्वार त्या कॅमेऱ्यात कैद होत नाही काय? हा प्रश्न आहे.

 

वाहतूक विभागात इतिहास

चंद्रपूरच्या इतिहासात चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेत पहिल्यांदाच 2 पोलीस निरीक्षकांची वर्णी लागली असली तरी चंद्रपुरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहे.

 

विशेष म्हणजे वाहतूक विभागाच्या बाजूलाचं अवैध ट्रॅव्हल्स स्टॅण्ड लागले आहे, तत्कालिन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी वाहतूक विभागाच्या बाजूला असलेले ट्रॅव्हल्स स्टॅण्ड बंद केले होते, त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी सुद्धा त्या आदेशाचा मान राखत स्टॅण्ड बंद केले, मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

सध्याचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची पोलिस प्रशासनावर पकड ढिली होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. त्यामुळेच शहरात वाहतूक अनियंत्रित होत असल्याचेही बोलल्या जात आहे. लहान सहान कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या पोलीस अधीक्षकांना शहरातील अपघात कसे काय दिसत नाही, हा प्रश्नच आहे.

शहरातील सिग्नल ची अवस्था काय?

शहरातील अति वर्दळीचा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातील सिग्नल व कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शोभेची वास्तू ठरत आहे, नागरिक 12 सेकंद पूर्वी सिग्नल तोडून जातात, यामध्ये कर्मचाऱ्याचा दोष नसला तरी चौकात लागलेले कॅमेरे त्या नियमभंग करणाऱ्या नागरिकांना टिपत नसतील का?

चंद्रपूर नागपूर मार्गावर बापट नगर येथे सुरू करण्यात आलेला सिग्नल आधी सतत सुरू होता त्यांनतर काही दिवसांनी तो बंद झाला, विद्या निकेतन शाळेसमोर अपघात घडला, त्या अपघातात दोघांनी आपला जीव गमावल्यावर तो सिग्नल पुन्हा सुरू झाला.

 

सामान्यांचा अंत बघू नका

शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निष्पाप बळी जात आहे आणि प्रशासन मात्र उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी आता सामान्य नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!