education system शाळा – महाविद्यालयात दिसण्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थी आंदोलने करताना दिसतायत. याला कारणही तसेच आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला वेळ नाही. शाळांच्या इमारती जीर्ण होत चालल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो अशा समस्या विद्यार्थ्यांसमोर उभ्या आहेत.ही स्थिती राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जिवती, गोंडपिपरी, कोरपना, राजुरा या तालुक्यातील.
education system यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळांची दुरवस्था आणि आपल्या पाल्यांची होत असलेली फरफट पाहता पालक चिंताग्रस्त झाले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रातील शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास कुणालाच स्वारस्य नाही. शाळेपर्यंत पोहचायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. एसटी बसमध्ये अनेकदा गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवले जाते. विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत आहे.
इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा
अनेक शाळेत तर शिक्षक नाहीत. जेथे शिक्षक आहेत ते वेळेवर येत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक वर्गात आले तरी मोबाईलमध्ये गुंतून असतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांची आहे.शिक्षकांवर कुणाचाही वचक नाही. जिल्ह्यात अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहे. विद्यार्थ्यांना एका खोलीत, सभागृहात एकत्र बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.अनेक शाळा घाणीने आणि शाळांचे रस्ते चिखलाने माखले आहेत. यातून मार्ग काढताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोठीच कसरत करावी लागत आहे. अनेक शाळामध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, अशी स्थिती आहे.विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा मिळत आहे. अळ्यायुक्त पोषण आहार दिला जातो.
अनेक शाळांमध्ये पोषण आहाराच्या गैर व्यवहार पुढे आला आहे.जिवती, गोंडपिपरी या मागासलेल्या तालुक्यात अनेक गावांमध्ये बससेवा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी शाळेत जावे लागते. अनेक गावाला लागून जंगल मार्ग असल्याने विद्यार्थ्यावर वन्यजीवांचे हल्ले झालेले आहेत.विद्यार्थ्यांच्या या समस्या फार गंभीर आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे.