leopard attack सावली – जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांनी चांगलाच धुडगूस सुरू केला आहे. थेट गावात पाळीव जनावरांची शिकार करण्याकरीता येणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे कुठे जीव जात आहेत. तर कुठे त्यांना जखमी व्हावे लागत आहे. शनिवारी २७ जुलैला दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा गावात शिरलेल्या बिबट्याने बाप -लेकाला जखमी केल्याची घटना घडली. दोघांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
अवश्य वाचा : जिल्हाधिकारी व सीईओ जेव्हा चिखलात उतरले, आणि केलं हे काम
Leopard attack चंद्रपुरात आज ऑरेंज अलर्ट आहे. संततधार पाऊस सुरू आहे. याच पावसात सावली तालुक्यातील पालेबारसा गावात दुपारी बाराच्या सुमारास बिबट पाळीव जनावरांची शिकार करण्याच्या उद्देशाने माधव मेश्राम यांच्या घरी शिरला. घरी त्यांचे दोन छोटे नातवंडे हे जेवण करीत असताना त्यांना दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे मेश्राम व शेजारी नेताजी कावळे हे हातात दंडे घेऊन हाकण्यासाठी गेले. घरा शेजारी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच बिबट्याने नेताजी कावळे यांच्यावर हल्ला केला. वडिलांवर बिबट हल्ला करीत असल्याचे पाहून मुलगा लेंस नेताजी कावळे हा धावून आला. बिबट्याने पहिले वडिलांवर त्यानंतर मुलगा लेंसवर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने जंगालच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे, वनाधिकारी पवनरकर, गोडसेलवार, धनविजय, आदे, चुदरी यांचा ताफा आला. बिबट्याला गावात व गावाशेजारी पाहण्यात आले परंतु तो पर्यंत तो पळून गेला होता.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला काय? आमदार किशोर जोरगेवार
पालेबारसा गाव जंगलालगत आहे.त्यामुळे गावात रात्री- बेरात्री वन्यप्राणी येतात. आता तर दिवसाही येऊ लागले आहेत. जखमींना सर्वप्रथम उपचाराकरीता रूग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरीता वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. कॅमेरे लावण्यात आले असून, पिंजरा बोलावण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी गस्त देणे सुरू केले आहे. भर दिवसाच बिबट्याने बापलेकावर हल्ला करून जखमी केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दशहत पसरली आहे.
दरम्यान १९ जुलैला सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी नलेश्वर गावात पहाटे बिबट्याने गावात शिरकाव करीत ६ नागरिकांवर हल्ला करीत जखमी केले होते. तर १६ जुलै रोजी सावली तालुक्यात रान डुक्कराने शाळकरी मुलींवर हल्ला करीत एका शेतकऱ्याला ठार केले होते, रान डुक्करच्या हल्ल्यात ६ नागरिक जखमी झाले होते.
नागरिकांनी पेरणी करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, सध्या या घटनेमुळे पाले बारसा गावात दहशतीचे वातावरण आहे.