Tirtha darshan yojana महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतू गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वधर्मातील 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
लाभ मिळविण्याकरिता कागदपत्रे आवश्यक : 1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. 2) लाभार्थ्याचे आधार कार्ड/ रेशनकार्ड 3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र /महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला 4) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 5). सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पनाचा दाखला किंवा पिवळे/ केशरी रेशनकार्ड 6) वैद्यकीय प्रमाणपत्र 7) पासपोर्ट आकाराचा फोटो 8) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक 9) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
योजनेच्या अटी व शर्ती : महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिक. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्टया निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
योजनेचे उद्दिष्ट : राज्यामधील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा उपलब्ध करून देणे. या योजनमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश राहील. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबीचा समावेश राहील.
Tirtha Darshan Yojana सदर योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल/ मोबाईल अपद्वारे /सेतू सुविधा केंद्राद्वारेऑनलाईन भरले जाऊ शकतात. अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.