Pothole free roads गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्ह्यातील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले.
समाजकारण : स्वखर्चातून गंगापूर गावात लावला आरो, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा पुढाकार
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले व सुनील कुंभे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. बोबडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, मुख्य अभियंता विजय बोरीकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Pothole free roads या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी रस्त्यांवरील खड्डयांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेनुसार जिल्हयात ओडीआर व व्हीआर चे 6 हजार किमीचे रस्ते आहेत, ज्यापैकी 450 किमी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. याच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी 5 कोटी रू. तर स्थायी दुरूस्तीसाठी 115 कोटी रूपयांची गरज आहे. याकरिता राज्याच्या ग्रामविकास विभागाला ताबडतोब निधीची मागणी करावी असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सिडीवर्कचे 39 रस्ते खराब झाले आहे, ज्याकरिता 1 कोटी 10 लक्ष रूपये लागतील असे अधिका-यांनी सांगीतले. हा निधी जिल्हा नियोजन समितीतून घ्यावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
जिल्हयात राष्ट्रीय महामार्गाच्या गडचिरोली विभागाच्या अखत्यारित चंद्रपूर जिल्हयात 219 किमी तर नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हयात 50 किमी रस्ता आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्याची दुरूस्ती कंत्राटदारांकडून पावसाने उसंत घेतल्यास 7दिवसात करून घेतल्या जाईल, असे त्या विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच श्री. मुनगंटीवार यांनी मुल रोडवरील चिचपल्ली गावाजवळ ड्रेनेज सिस्टीमसाठी नाल्या करण्याच्या कामात विलंब झाल्याबद्दल अधिका-यांना खडसावले. त्यावर अधिका-यांनी त्या कामाचे अंदाजपत्रक बनवून वरिष्ठ अधिका-यांकडे पाठविले असल्याची माहिती दिली. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हयात 686 किमीचे राज्य रस्ते आहेत ज्यापैकी 70 किमी चे रस्ते खराब झाले आहेत, तर जिल्हयात एमडीआर चे 2116 किमीचे रस्ते असून त्यापैकी 555 किमी चे रस्ते खराब झाले आहेत ज्यापैकी 70 टक्के काम हे डब्ल्युबीएम पध्दतीने करणार आहे. आमच्या विभागाकडे 17.57 कोटी रूपये वार्षीक देखभालीसाठी मंजूर झाले आहेत त्यापैकी 74 ठिकाणी 2.28 कोटी रूपये तात्पुरता खर्च करण्यासाठी घेणार आहोत. हे काम पावसाने उसंत घेतल्यावर 15 दिवसात पूर्ण करण्यात येईल.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या अधिका-यांच्या माहितीनुसार शहरात 600 किमीचे रस्ते आहेत. त्यापैकी 400 किमीचे रस्ते हे सिमेंटचे आहेत. सध्या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी 40 लाख रूपयांची तर स्थायी दुरूस्तीसाठी 2 कोटी रूपयांचे तरतूद आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे अशा रस्त्यांना त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.
यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बागला चौक ते बाबुपेठ ब्रिज हा रस्ता अतिशय खराब झाला असून त्याच्यासह गावातील मुख्य रस्ते सिमेंटचे करावेत, ज्यामध्ये उत्तम लायटींग करावी. पालकमंत्री यांनी बेलसनी येथील रस्ता न झाल्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीत अनेक पदाधिका-यांनी अनेक ठिकाणी रस्ते खराब आहे यासंदर्भात माहिती दिली. श्री. मुनगंटीवार यांनी ताबडतोब रस्ते दुरुस्त करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह देवराव भोंगळे, राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अमर बोडलावार, बंडू गौरकार उपस्थित होते.