Mohan Bhagwat | शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग – डॉ.मोहन भागवत

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : चंद्रपूर – डॉ. मोहनजी भागवत : शाळा चालवणे सोपे काम राहिले नाही. शिक्षण व आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग झाल्या आहेत. त्यातही काही जण पैसा कमवण्यासाठी शाळा चालवतात. सेवा म्हणून शाळा चालवणे हे व्रत आहे. व्रत हे नेटाने आणि तेवढ्याच निष्ठेने चालवावे लागते. सन्मित्र सैनिकी शाळा (sanmitra sainik vidyalaya) तसा प्रयत्न करीत आहे ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

बुधवार, 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी येथील सन्मित्र सैनिकी शाळेच्या 30 व्या वार्षिकोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर, सचिव अ‍ॅड. निलेश चोरे, शाळेच्या प्राचार्य अरुंधती कावडकर, कमांडंट सुरेंद्रकुमार राणा व्यासपीठावर उपस्थित होते.

खासदार धानोरकर यांनी गाजवलं लोकसभा अधिवेशन

डॉ. भागवत पुढे म्हणाले, सेवा म्हणून शाळा चालवणे ही केवळ शाळा व्यवस्थापनाचीच जबाबदारी नाही, तर ती समाजाचीही आहे. पोट भरण्यासाठी शिक्षण हे संकुचित व्याख्या झाली. शिक्षणाचा खरा उद्देश मनुष्य विचारशील व्हावा हा आहे.

सुबुध्दी देणारे, संवेदना निमार्ण करणारे शिक्षण हवे. दुसर्‍याचा विचार करायला लावणारे शिक्षण हवे. स्वतः शिकून आपल्या कुटुंबाचे जीवन उन्नत करणार्‍याला चांगले मानले जाते. कुटुंबासोबतच गावासाठी धावपळ करणार्‍याला त्यापेक्षा जास्त मान दिला जातो.

आपल्या देशासाठी कार्यरत राहिलेल्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी होते आणि जो अवघ्या जगासाठी झटतो त्याला साष्टांग नमस्कार घातला जातो. स्वामी विवेकानंदांसारखे जीवन असेल तर ते सार्थकी लागते, असे विचार त्यांनी मांडले. डॉ. परमानंद अंदनकर यांनी, ‘सर्वे भवन्तु सखिनः सर्वे सन्तु निरामया’ हे ब्रिद व्हावे यासाठी सन्मित्र मंडळ कार्यरत असल्याचे म्हटले. प्रास्ताविक अ‍ॅड. निलेश चोरे यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन अरुंधती कावडकर यांनी केले. (Sanmitra sainik school chandrapur)

मोहनजींच्या हस्ते ‘सन्मित्र बेस्ट कंपनी अवार्ड’ने नेताजी सुभाष कंपनीला पुरस्कृत करण्यात आले. तर ‘सन्मित्र बेस्ट कॅडेट’ म्हणून नायक श्रीकांत वाडणकर या विद्यार्थ्याचा सत्कार झाला. यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार, जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र बोकारे, डॉ. मुकुंद अंदनकर, डॉ. प्रवीण पंत यांच्यासह जिल्ह्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

बाल सैनिकांनी सादर केले युध्द कौशल्य
डॉ. मोहनजी भागवत यांच्यापुढे सन्मित्र सैनिकी शाळेच्या बाल सैनिकांनी युध्द कौशल्य सादर केले. व्यायाम योग, योगासन, नियुध्द, मल्लखांब आणि घोष प्रात्यक्षिकांसह चित्तथरारक मनोरेही त्यांनी उभारले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!