Waiting For Development
Waiting For Development : चंद्रपूर महानगरातील बाबुपेठ येथील सिद्धार्थ नगर वसाहत आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. वेकोलीने १९८८ मध्ये स्थापन केलेल्या या वसाहतीकडे महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. (aap party )आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे मदतीची मागणी केली.
सिद्धार्थ नगर हा प्रामुख्याने दलित वस्तीचा भाग आहे. येथे रस्ते, नाल्या आणि स्वच्छ पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. वसाहतीतील नागरिक या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनावर दलित विकास निधीतून प्रभागातील कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनादरम्यान प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या महिलांनी वस्तीतील समस्यांबाबत आवाज उठवला. “गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे आणि शिल्पा शेंडे यांनी नागरिकांसोबत उभे राहत प्रशासनावर टीका केली. राजू कुडे म्हणाले, “सिद्धार्थ नगरातील नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. दलित विकास निधीचा योग्य उपयोग करून येथे रस्ते, नाले आणि पाणीपुरवठ्याची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. अन्यथा, जनतेसह तीव्र आंदोलन उभारले जाईल.” यावेळी ज्योस्ना जीवणे, ललिता शेळके, स्वप्ना करमणकर, सुलभा चांदेकर, निलू शेळके, भसारकर काका, श्रीमती बाराहाते, नगराळे, चौधरी, पोपटे इत्यादी उपस्थित होते