chandrapur district tiger attack
chandrapur district tiger attack : गायी, म्हशी आणि शेळ्या चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. त्याच्या पार्थिवाचे अवशेष बफर झोनच्या कक्ष क्रमांक 756 मधिल नियत क्षेत्र काटवन मध्ये मंगळवारी सकाळी सापडले. मॄत गुराख्याचे नाव बंडू चिंधुजी कोल्हे असे आहे. 55 वर्षीय गुराखी मूल जवळील रामपुर या गावातील रहिवासी होता.
या घटनेने गावात खळबळ उडाली. मानव वन्यजीव संघर्षात आणखी एक गुराखी बळी पडल्याने जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर सापडला आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा हा तिसरा बळी आहे.
चंद्रपुरात सट्टा मटक्याची अलिखित परवानगी
नेहमी प्रमाणे बंडू कोल्हे हे रामपूर आणि मूल येथील जनावरे व शेळ्या घेऊन जंगलात चराईसाठी सोमवारी सकाळी गेले होते. त्याच्यातील काही शेळ्या भटकल्याने ते शोधात होते. दरम्यान त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधून शेळ्या घरी आल्या काय याबाबत विचारपूस केली होती.
रामपूर ते करून काटवन हा बफर झोनचा परिसर घनदाट जंगलाचा आहे. या परिसरात वाघाचे मोठे वास्तव्य आहे. शेळ्या च्या शोधात गुराखी जंगलात असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. संध्याकाळी गायी, म्हशी आणि शेळ्या न चुकता घरी परतल्या. मात्र, बंडू कोल्हे घरी परत आलेला नव्हता. त्यामुळे पत्नीने गावात ही माहिती दिली.
वनविभागाला सूचना देण्यात आली. मूल येथील बफर झोनचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी जंगलात शोध मोहीम राबवली. संध्याकाळ पर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. घनदाट जंगल आणि अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी शोध मोहीम राबवली असता कक्ष क्रमांक 756 मध्ये त्याचे अवशेष सापडले. वाघाने ठार मारून बंडू चे शरीर पूर्ण फस्त केले होते. फक्त शरीराचे हाडे तेवढी शिल्लक होती.
घटना स्थळी त्याची काठी आढळून आली. सापडलेली हाडे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आली. ती हाडे डीएनए साठी पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. रामपूर आणि घटना स्थळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांनी भेट देऊन पाहणी केली. मॄतकाच्या कुंटुबियांना वनविभागाच्या वतीने तात्काळ वीस हजार रुपयांची मदत करण्यात आली.
मानव वन्यजीव संघर्षाचा रामपूर गावाला मोठा हादरा बसला आहे. याआधी सुद्धा रामपूर, चिचोली या गावातील गुराखी वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेली आहेत. मूल तालुक्यातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वाघाच्या हल्ल्यात तिसरा बळी
14 जानेवारीला बल्लारपूर येथे बांबू कामगाराला वाघाने ठार केले होते, त्यानंतर चिमूर येथे 25 जानेवारीला गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, आणि 27 जानेवारीला मूल येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला. जानेवारी महिन्यात वाघाने तिघांचा बळी घेतल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे.