chinese manja
chinese manja : मकरसंक्रांत आली की चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या जीविताला धोका असलेल्या नायलॉन मांजा ची आवक वाढते, विशेष बाब म्हणजे मांजा विक्रेते आपल्या फायद्यासाठी नागरिकांचे गळे कापायला तयार असतात. यावर्षी नायलॉन मांजा जिल्ह्यातून भुईसपाट व्हावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) कंबर कसली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल शहरात नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री करणाऱ्या अंकुश बोडखे यांच्या प्रसाद कॉम्प्लेक्स, बाजार चौकातील गोडावून मध्ये धाड मारली.
गुन्हे शाखेने गोडवूनची झडती घेतली असता प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या 43 चकऱ्या आढळून आल्या, पोलिसांनी यावेळी एकूण 39 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत करन किराणा दुकानाचे संचालक 31 वर्षीय अंकुश नंदकिशोर बोडखे यांनी आपल्या मालकीच्या गोडावून मध्ये मानव व पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण करणारा नायलॉन मांजा साठवून ठेवल्याने बोडखे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223, 292, 293 सहकलम 5, 15 पर्यावरण (संरक्षण)अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि बलराम झाडोकार, सपोनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांनी केली.