how to reduce road accidents
how to reduce road accidents : रस्ते अपघात किंवा त्यात होणारे मृत्यु हा अतिशय गंभीर विषय आहे. हे अपघात कमी करायचे असले तर रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावर असणा-या अवैध पार्किंगला आळा घालणे, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक तथा कायदेशीर कारवाई करणे आदी बाबींसह आवश्यक उपाययोजना त्वरीत कराव्यात, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.
नियोजन सभागृह येथे संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, परिविक्षाधीन पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्याच्या घरी खासदारांनी घेतला भोजनाचा आस्वाद
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले खड्डे तात्काळ बुजवावे, जेणेकरून अपघात होणार नाही. संबंधित यंत्रणेला याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्र देऊन निर्देश द्यावेत. जड वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक आहे. मात्र अजूनही काही वाहने विना ताडपत्री वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करावी. शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो. अशा ट्रॅव्हल्सधारकांवर कारवाई करावी. road safety
शहरातील ज्या हॉटेलमालकांकडे पुरेशी पार्किंग व्यवस्था नसेल, त्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस द्यावी. हॉटेलमालकांनी आपल्या ग्राहकांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. जेणेकरून रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत. महामार्गावर वेग मर्यादेचे ठळक अक्षरात फलक लावावेत. सर्व शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांना हेल्मेटसक्ती करावी. विद्यार्थ्यांना वाहतुकीचा नवीन परवाना देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर मोहीम सुरू करून वाहतुकीच्या नियमांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. (how to reduce road accidents)
या विषयांवर झाली चर्चा : संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या गत बैठकीचे इतिवृत्त, सन 2023-24 मधील अपघाताची तुलनात्मक माहिती, रस्ता सुरक्षा अभियान – 2025 अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन करणे, रस्ता सुरक्षा विषयक विशेष तपासणी मोहीम कार्यवाही तिव्रता वाढविणे, अपघातप्रसंगी मदत करणा-या जिल्ह्यातील जीवनदुतांचा सन्मान आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सादरीकरण केले. बैठकीला अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.