Legal Officer Jobs : चंद्रपुरात विधी अधिकारी पदासाठी अर्जाची मागणी

Legal Officer Jobs : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये, दि. 6 एप्रिल 2011 व समक्रमांकाचे निर्णय दि. 30 जुलै 2011 मधील तरतुदीनुसार ‘विधी अधिकारी’ हे पद कंत्राटी पद्धतीने एकावेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे आहे. त्याकरिता, पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

शैक्षणिक अहर्ता व अनुभव:

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. विधी अधिकारी या पदासाठी वकिली (Lawyer) व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवार महसूल, सेवाविषयक तसेच प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी आदीबाबत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षमतेने पार पाडू शकेल. विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

चंद्रपुरात बॅनर लावायचा तर गुन्हा होणार दाखल

सदर पदाकरिता एकत्रित मानधन रु. 30 हजार असून दुरध्वनी व प्रवास खर्च रु. 5 हजार असे एकत्रित मानधन रुपये 35 हजार प्रति महिना देय राहील. या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.

महसूल विभागाच्या (Revenue Department) शासन निर्णयानुसार, विधी अधिकारी यांची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारित राहील. विधी अधिकारी हे पद नियमित स्वरूपात 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येईल. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी तसेच कोणताही गुन्हा नोंद नसावा.

विधी अधिकारी यांचे काम असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यांचे विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची तात्पुरत्या स्वरूपातील नेमणूक रद्द करण्यात येईल. तसेच विधी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर इतर खाजगी कामे करता येणार नाही.

पदभरतीबाबत कार्यक्रम :

सदर पदाकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध केलेल्या यादीमधील चुकीबाबत उमेदवारांनी कार्यालयामध्ये समक्ष लेखी अर्ज करण्याची 16 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख असेल. तर झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 17 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांची प्राविण्य पडताळणीसाठी लेखी चाचणी, प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना दि. 20 जानेवारी 2025 रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे,  प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कार्यालयाच्या  https://chandrapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती,  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर या पत्त्यावर दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा, स्थगित, रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, चंद्रपूर यांना राहील.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!