Republic day chandrapur । चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Republic day chandrapur

 प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

Republic day chandrapur : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी तन-मन-धनाने या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी  दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना राष्ट्रपती पदक जाहीर

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपील पालीवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

Guardian minister uike

शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रमातून येथील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

 स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. या वारसामुळेच येथील संस्कृती बहरली आहे. त्याचे आपण साक्षिदार आहोत. अशा ऐतिहासिक आणि विविधतेने नटलेल्या, वनभूमी, खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या, तसेच जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणा-या चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आज ध्वजारोहण करताना आज मनस्वी आनंद होत आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील क्रांतीकारकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुध्द क्रांतीची मशाल हाती घेतली. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. देश स्वतंत्र झाला तरी देशाचा कारभार भारतीयांच्या हातात नव्हता. आपल्या देशाचा कारभार आपल्याच पध्दतीने चालावा, यासाठी भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारीत तसेच बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि अनेक धर्माचा समावेश असलेल्या या देशाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली. तो दिवस आपण ‘संविधान दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करीत असतो. तसेच भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुध्दा आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, चंद्रपूर या नावाने प्रसिध्द असलेला हा जिल्हा प्राचीन काळी ‘लोकापूर’ या नावाने ओळखला जात होता. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत म्हणजे 1874 पासून हा जिल्हा चांदा या स्वतंत्र नावाने गणला जाऊ लागला. कालांतराने त्याचे नामांतर इंद्रपूर आणि त्यानंतर जानेवारी 1964 चंद्रपूर असे झाले. क्रांतीकारक आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्याची जबाबदारी शासन, प्रशासन यांच्यासह प्रत्येक भारतीयाचीसुध्दा आहे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पुर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी परेड संचलनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक, उपस्थित मान्यवरांची आस्थेने विचारपूस केली.

शहिदांच्या कुटंबियांना स्मृतीचिन्ह : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबातील वीर नारी, वीर पिता, वीर माता, शौर्य चक्र प्राप्त जवानांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात वीरपत्नी वैक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरपत्नी अरुणा सुनील रामटेके, वीर माता पार्वती वसंत डाहुले, वीर पिता वसंतराव डाहुले, वीरमाता छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, शौर्य चक्र प्राप्त सुबेदार शंकर मेंगरे यांचा समावेश होता.

उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींचा सत्कार : लोकपयोगी योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आकापूर (ता. नागभीड), चिचबोडी (ता. सावली),  माजरी (ता. भद्रावती).

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!