Chandrapur local crime branch
Chandrapur local crime branch : चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अंमली पदार्थ विक्री, वाळू तस्करी, तंबाखू माफिया आणि इतर अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्णयानुसार करण्यात आली आहे. काचोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
नागपूर क्राईम ब्रँचमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी यापूर्वी नागपूर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात मोठी भूमिका बजावली आहे. नागपूर क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असताना त्यांनी विविध मोठ्या गुन्ह्यांची उकल केली होती. अतिसंवेदनशील गुन्ह्याची त्यांनी उकल केल्याने त्यांना पोलीस आयुक्तांनी सन्मानित केले होते हे विशेष. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच त्यांची चंद्रपूरमध्ये बदली करण्यात आली असून, आता त्यांनी इथल्या गुन्हेगारीवरही कठोर कारवाई करण्याची जबाबदारी घेतली आहे. Amol Kachore police inspector
चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वीही दाखवले कार्यकौशल्य
पोलीस निरीक्षक काचोरे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे स्वरूप चांगलेच परिचित आहे. याआधी त्यांनी नागभीड, वरोरा आणि भद्रावती पोलीस ठाण्यात काम करताना आपल्या कार्याची छाप सोडली होती. या ठिकाणी त्यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळेच स्थानिक गुन्हे शाखेच्या जबाबदारीसाठी ते योग्य उमेदवार ठरले आहेत. Amol Kachore crime branch news
पूर्वीच्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हेगारीवर घेतला होता कठोर आळा
यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी केले होते. त्यांच्या कार्यकाळात एमडी ड्रग्स, वाळू माफिया, तंबाखू माफिया आणि इतर अवैध धंद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी जिल्ह्यातील अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल केली होती, त्यामुळे गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत पुन्हा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने नवीन अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः अंमली पदार्थांचा सुळसुळाट, वाळू तस्करी, अवैध मद्यविक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अमोल काचोरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. How Chandrapur police fights crime
लोकांची अपेक्षा – गुन्हेगारीवर कठोर कारवाई होणार का?
पोलीस निरीक्षक काचोरे यांनी यापूर्वी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेबाबत कोणालाही शंका नाही. मात्र, चंद्रपूरसारख्या गुन्हेगारी वाढलेल्या जिल्ह्यात त्यांना आता छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गुन्हेगारीचे लचके तोडण्याचे मोठे आव्हान आहे. ते या जबाबदारीत कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील नागरिक आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसतो का, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले आहे.