Ashok Uike minister
Ashok Uike minister : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे (Tadoba Andhari Tiger Reserve) चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे. मानवाच्या संरक्षणासोाबतच वन्यजीवांचाही समतोल राखणे गरजेचे आहे. मात्र आपला अधिवास सोडून जंगलातील वाघ गावांच्या जवळ येत आहे. त्यामुळे मानव – वन्यजीव संघर्ष (Human-wildlife conflict) वाढत असल्याचे निदर्शनास येते. हा संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाने आणखी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
चंद्रपुरात कॉपी चा महापूर, शिक्षण विभागाच्या पथकाने मारली धाड
वीस कलमी सभागृह येथे वन विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक सुमीत कुमार, संचालक (कोर) आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, राकेश सेपट, कुशाग्र पाठक, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, सचिन शेंडे, बापू येळे, वन्यजीव मंडळाचे सदस्य धनंजय बापट व वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, मानव – वन्यजीव संघर्षात ज्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यु झाला असेल, त्या कुटुंबातील सदस्याला केवळ आर्थिक मदतच नाही तर वनविभागाने नियमित रोजगारसुध्दा उपलब्ध करून द्यावा. प्राचीन काळापासून जल, जंगल, जमीनचे संरक्षण येथील आदिवासी करीत आले आहेत. या आदिवासी युवक-युवतींना कौशल्य विकासातून चांगले प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे. त्यासाठी वन विभागाने धोरण निश्चित करावे. अनुसुचित जमातीच्या शेतक-यांकडून सागवान, झाडे व इतर वनोपज विकत घेतल्यानंतर या शेतक-यांना वेळेवर मोबदला देण्यात यावा. याबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आतापर्यंत किती शेतक-यांना मोबदला दिला, याचा सविस्तर अहवाल सादर करावा.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरळ लाभ मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उभारावी. या योजनेसोबतच कौशल्य विकासाची जोड देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. चंद्रपूरचे वनवैभव पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांसाठी (Wildlife tourism Maharashtra) रस्त्यांची सोयीसुविधा उच्च दर्जाचीच असावी. ग्राम परिसर व आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत वनसमित्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके (Ashok Uike minister) यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
सादरीकरणात चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर म्हणाले, जिल्ह्यात एकूण 4845.30 चौ. कि.मी. म्हणजे एकूण भौगालिक क्षेत्राच्या 42.34 टक्के वनक्षेत्र आहे. महाराष्ट्रात आज वाघांची संख्या 450 च्या आसपास असून यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 225 वाघ आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये 95 ते 100 वाघ आहेत. आतापर्यंत 26829 शेतक-यांना सौर उर्जा कुंपनाचा लाभ देण्यात आल्याचे सांगितले. सोबतच जिल्ह्यातील वन विभागाच्या महत्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली.