Nazul holders permanent patta order
Nazul holders permanent patta order : चंद्रपूर – (२६ ऑगस्ट २०२५) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीच्या सर्वेक्षणाकरिता पाच एजन्सी नियुक्त करून त्याचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचे निर्देशही ना. बावनकुळे यांनी दिले असून सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला जोड्याचा प्रसाद
चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, तसेच विविध विषयांवर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अवर सचिव आश्विनी यमगर, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. तर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अप्पर आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त चीद्रावार, संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार सीमा गजभिये, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गायकवाड आदी अधिकारी व्हिसीच्या माध्यमातून उपस्थिती होती. Nazul land permanent pattas process
नागरिकांची सतत मागणी
चंद्रपूर शहरात नझूल जागेवर मोठी लोकवस्ती असून या नागरिकांकडे कायमस्वरूपी पट्टे नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील ५० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असूनही पट्टे न मिळाल्याने येथील नागरिक सतत मागणी करत होते. याच मागणीसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित स्वरूप महसूल मंत्री यांनी सदर विषयावर बैठक घेतली. या बैठकीत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या ७०० नागरिकांना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले.
सर्व्हेसाठी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश
चंद्रपूर शहरात 39 झोपडपट्टी नझुलच्या जागेवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. यातील 14 झोडपट्टांचे सर्वेक्षण झाले आहे. तर उर्वरित झोडपट्टींचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र सध्या एकाच एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू असल्याने काम संथ गतीने सुरू असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचेही निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आता शहरातील जवळपास १८ हजार घरांना पट्टे मिळणार आहेत. त्यासोबतच घुग्घुस येथील नझूल धारक नागरिकांनाही पट्टे देण्यात येणार आहेत.
याशिवाय संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच नझूल प्रकरणांसाठी स्वतंत्र तलाठी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. घुग्घुससाठी स्वतंत्र क्रीडांगणाची जुनी मागणी आमदार जोरगेवार यांनी बैठकीत मांडली. त्यानुसार जागेची अडचण दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय घुग्घुस परिसरात अप्पर तहसील कार्यालयासही मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. nazul land survey agencies

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळेच या बैठकीत मतदार संघातील प्रश्न प्राधान्याने चर्चेत आले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळणार असून चंद्रपूर-घुग्घुस परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीला चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देवतळे, नामदेवभाऊ डाहुले, भाजपा महामंत्री रवींद्र गुरनुले, शाम कणकम, सविताताई दंडारे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. Nazul holders permanent patta order










