Chandrapur road repair update
Chandrapur road repair update : चंद्रपूर ९ ऑक्टोबर २०२५ (News ३४ वृत्तसेवा): शहरातील ‘जीवघेण्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या ५ दिवसांच्या अल्टिमेटम’मुळे चंद्रपूर शहर महानगर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तीव्र इशाऱ्यानंतर काही तासांतच मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहराच्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या तसेच दुरुस्तीच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.
Also Read : मनपा आयुक्त पालीवाल यांची मुंबई मध्ये बदली
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुक्तांना पत्र पाठवून रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधले होते आणि ५ दिवसांत काम सुरू न झाल्यास, मनपाच्या निष्क्रियतेविरोधात प्रांगणातच “गिट्टी फेक” आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला होता. नागरिकांची सुरक्षितता आणि वाढते अपघात लक्षात घेता रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली होती. Chandrapur MP Pratibha Dhanorkar road action
या इशाऱ्याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर आणि सर्वाधिक खड्डे असलेल्या भागांमध्ये काम सुरू केले आहे.
शहरवासीयांना दिलासा
“जीवघेण्या” रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना सुरू झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनआंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच प्रशासन त्वरित कामाला लागले, अशी चर्चा आता चंद्रपूर शहरात रंगली आहे.
मनपाने काही भागांत काम सुरू केले असले तरी, शहरातील अन्य भागात अद्याप खड्डे कायम आहेत. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपला इशारा कायम ठेवला आहे. उर्वरित खड्डे ५ दिवसांच्या आत बुजवले नाहीत, तर “गिट्टी फेक” आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. नागरिकांना पूर्ण दिलासा मिळेपर्यंत प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.










