Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur
Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur : चंद्रपूर 26 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा नव्हे, तर आनंद, एकात्मता आणि स्नेहाचा उत्सव आहे. या उत्सवात जेव्हा संगीताचा सहवास मिळतो, तेव्हा ती सकाळ अधिक मंगलमय बनते. स्वरांच्या माधुर्याने मन प्रफुल्लित होते, विचारांना नवीन दिशा मिळते आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचतो. आजच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने हाच सुंदर अनुभव दिला आहे. कलाकारांच्या सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आनंदाच्या लहरींनी भारला आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Also Read : त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू
श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याणकारी समिती तर्फे श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याण मंदिराच्या प्रांगणात ‘दिवाळी पहाट’ या सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक रमेश देशमुख, सुरेश धानोरकर, वझलवार, झाडे, अशा बेले, येगींलवार, सुमीत बेले यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या मंद वाऱ्यासह सुरेल गीतांच्या लहरींनी वातावरण भारले होते. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनात दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. BJP leader at Diwali Pahat Chandrapur news

या कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, संगीत ही आत्म्याची भाषा आहे. ती माणसाला माणसाशी जोडते, विचारांना उंची देते आणि मनाला प्रसन्न करते. आपल्या समाजात अशा सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.
सर्वांगीण विकास करणार – आमदार जोरगेवार
ते पुढे म्हणाले की, श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याणकारी समितीने असा सुंदर उपक्रम राबवून समाजात आनंद, स्नेह आणि संस्कृतीचा संदेश दिला आहे. येथील हणुमान मंदिर परिसरासाठी सुरक्षाभिंत उभारण्याची मागणी करण्यात आली होती, ती आपण पूर्ण केली आहे. आज संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक आणि सुशोभित झाला आहे. येत्या काळातही या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न असणार आहे.
आमदार जोरगेवार यांनी समितीतील कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की, येथील नागरिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमीच सक्रियपणे सहभागी होतात. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम समाजातील एकोपा वाढवतात, विचारांची देवाणघेवाण घडवतात आणि नव्या उर्जेचा संचार करतात. कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांना व आयोजकांना आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.










