Farmer killed by tiger Chimur Forest Range
Farmer killed by tiger Chimur Forest Range : चिमूर (चंद्रपूर): चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा (Shivra) गावात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. रविवार (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, ६० वर्षीय नीलकंठ भुरे हे शेतकरी आणि शिवरा गावचे माजी सरपंच वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. विशेष म्हणजे, याच परिसरात अवघ्या एका महिन्यात वाघाच्या हल्ल्यातील ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. Tiger attack Shivra village Chandrapur
Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे थैमान, गोंडपीपरी तालुक्यात महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
रात्री उशिरा मृतदेह आढळला
नीलकंठ भुरे हे शंकरपूर-चिमूर रस्त्यावरील त्यांच्या शेतामध्ये पिकाची पाहणी करण्यासाठी सायंकाळी चार ते पाच वाजता गेले होते. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतात शोध घेतला. शेतात त्यांची सायकल दिसल्यामुळे कुटुंबीयांना शंका आली.
गावातील ३० ते ४० लोकांना सोबत घेऊन पुन्हा शोधमोहीम (Search Operation) राबवल्यानंतर, रात्री ११ वाजता त्यांचा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत नाला किनारी आढळून आला. वाघाने हल्ला करून त्यांचे शरीर ओढत नेले होते आणि त्यांचे दोन्ही पाय खाल्ले होते.
लोकप्रतिनिधींची धाव, रात्री दीड वाजता आश्वासन
घटनेची माहिती मिळताच चिमूर वन विभाग आणि भिसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक आणि सरपंच अतुल नन्नावरे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.
जोपर्यंत वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी येऊन वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आणि कुटुंबाला योग्य आर्थिक मदत (Financial Aid) देण्याचे आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
अखेर, सोमवारी पहाटे दीड वाजता चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याचे आणि ₹ १० लाख मदत देण्याचे आश्वासन दिले. यानंतर ₹ ३० हजार रोख आणि ₹ ९ लाख ७० हजार चा धनादेश (Cheque) कुटुंबीयांना तत्काळ सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेमुळे चिमूर (Chimur News) परिसरात वाघाची दहशत (Tiger Terror) शिगेला पोहोचली असून, वनविभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.










