lightning strike in Chandrapur
lightning strike in Chandrapur : राजुरा, दि. ६ ऑक्टोबर : ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसासोबत विजेच्या जोरदार कडकडाटाने कोहपरा मणगाव शेतशिवारात एक मोठी व हृदयद्रावक दुर्घटना घडली. शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने ज्योत्स्ना प्रमोद कणपलीवार (वय अंदाजे ३५) या महिलेचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे.
Also Read : चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायतीत महिलाराज
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी मणगाव शिवारात मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. त्याच वेळी ज्योत्स्ना कणपलीवार या त्यांचे पती प्रमोद कणपलीवार, सासू मंदाबाई कणपलीवार आणि मंजुषा केशव जीवतोडे यांच्यासोबत शेतातील कामात व्यस्त होत्या. अचानक वीज कोसळल्याने या चौघांनाही विजेचा जबरदस्त धक्का बसला.
मृत्यूची वीज कोसळली
या घटनेत ज्योत्स्ना कणपलीवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रमोद कणपलीवार, सासू मंदाबाई कणपलीवार आणि मंजुषा केशव जीवतोडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि सर्व जखमींना उपचारासाठी राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर, त्यांना अधिक उपचारांसाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या भीषण घटनेमुळे कोहपरा गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या मृत्यूने आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या जखमी होण्याने गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.










