tiger attacks on farmers in gondpipari region
tiger attacks on farmers in gondpipari region : गोंडपिपरी 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) :– तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात शनिवारी (दि. १८) वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भाऊजी पत्रू पाल (वय ७०) यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आहे. वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 34 नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्यामध्ये 30 वाघाच्या, 1 अस्वल, 1 बिबट व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Also Read : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
गावकऱ्यांची शोधमोहीम आणि भयावह दृश्य
भाऊजी पाल हे शनिवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शेतातील बैल आणण्यासाठी गेले होते. परंतु सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली असता, बैलजोडी बांधलेली दिसली मात्र भाऊजी पाल यांचा काहीच मागमूस लागला नाही.
अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली आणि सकाळी पुन्हा शोध घेतला असता गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले, शेतकरी भाऊजी पाल यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, वाघाने हल्ला करून भाऊजी पाल यांना ठार केल्याचे उघड झाले. farmer killed by tiger 2025
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकर, बिटगार्ड दत्ता, तसेच निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संतापही व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात त्यांची पत्नी असून गावात शोककळा पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघाचा वावर वाढला आहे. शेतशिवारात वाघाच्या पाऊलखुणा सतत आढळत आहेत. या काळात कापूस वेचणे, धान कापणी आणि सोयाबीन संकलन अशी शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी अधिकच धोक्यात आहेत.
तहसीलदार शुभम बहाकर आणि वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून उपाययोजना सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर यांनी दिली आहे.










