चंद्रपूर: 1 मे पासून जनगणनेचा पहिला टप्पा, टीव्ही, मोबाइल, शौचालयाचे प्रश्न विचारणार

April 29, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपूर शहरात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आगामी १ मेपासून सुरुवात होत असून, या पहिल्या टप्प्यात घर, कुटुंबातील भौतिक सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. नागरीकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून ऑनलाइन स्व-गणना करण्याचे आवाहन Chandrapur चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश यांनी केले आहे. (चंद्रपुरात उष्णतेचा प्रकोप)

 

   
   जनगणना Census दोन टप्प्यांत पार पडणार असुन पहिल्या टप्प्यात घरगुती आणि गृहनिर्माण माहिती गोळा केली जाईल. १ मे पासुन नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, तर १६ मे पासुन अधिकारी घराघरात जाऊन माहिती संकलन करतील. घराची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता यांची माहिती यामध्ये घेतली जाणार आहे.
  कुटुंबप्रमुख या प्रश्नांची उत्तरे प्रगणकाला देतील. प्रगणक ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल. कुटुंबप्रमुखाची माहिती ऑनलाइन देखील गोळा केली जाईल.



जनगणनेचं महत्त्व -
जनगणनेतून जी माहिती उपलब्ध होईल ती धोरण ठरवण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनासाठी फायदेशीर होईल. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज संस्थांच्या मतदारसंघांच्या फेररचनेसाठी आणि आरक्षण निश्चितीसाठी जनगणनेच्या डेटाचा वापर होईल. संशोधकांना देखील या माहितीचा फायदा होईल.

माहिती भरल्यानंतर तयार होणार एक युनिक आयडी -
नागरिकांना नोंदणी करण्यासाठी www.se.census.gov.in हे पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. नागरिकांनी माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होणार आहे. ज्या नागरिकांनी स्वतः गणना केली आहे असा नागरिकांना प्रगणक घरी आल्यानंतर युनिक आयडी क्रमांक सादर करावा लागणार आहे. दि. १६ मे ते २४ जूनपर्यंत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना ही फेब्रुवारी २०२७मध्ये पार पडणार आहे.



प्रगणकांसाठी मनपाचे शिबीर -
१५ मेनंतर प्रगणकाकडून घरोघरी जाऊन नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी मनपा प्रशासनाकडून ६६० प्रगणकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर ११५ पर्यवेक्षक व ११ फिल्ड टेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रगणकांसाठी दिनांक २३ एप्रिल २०२६ ते ०८ मे २०२६ पर्यंत प्रशिक्षण शिबीर रफी अहेमद किदवई शाळा,राणी हिराई सभागृह मनपा,सावित्रीबाई फुले मनपा शाळा बाबूपेठ, मनपाची नवीन अभ्यासिका महादेव मंदिर जवळ बाबूपेठ, बीजेएम करमेल अकॅडमी तुकुम या ५ जागांवर येथे सुरू झालेले आहे.



कुटुंबातील भौतिक सुविधांविषयी प्रश्न -
१. जनगणनेच्या पहिल्या टप्यात प्रामुख्याने घरांची सूचिबद्धता आणि कुटुंबातील सुविधांवर भर दिला जाणार आहे. यामध्ये नागरिकांकडे कोणत्या सुविधा आहेत, यावर विविध प्रश्न विचारले जाणार आहेत.
२.यात टीव्ही, मोबाइल, संगणक, वाहन, कुटुंबाचे वेतनासह शौचालयाची उपलब्धता, प्रकाशाचा स्त्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सांडपाणी,स्वयंपाकाचे इंधन यासह इतर प्रश्नाची उत्तरे नागरिकांना द्यावी लागणार आहेत.
३.तसेच कुटुंब प्रमुखाचे नाव, जातीचा प्रवर्ग, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबातील विवाहित जोडपे, घरातील खोल्या, घराच्या मालकी हक्काची माहिती नोंदवावी लागणार आहे
४.भाडेकरुंसाठी ते ज्या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहेत. तेथील माहिती पोर्टलवर किंवा प्रगणकास द्यावी लागणार आहे. नोंदणी करतांना तसा पर्याय शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Leave a Comment

+