Chandrapur Pole Theft । चंद्रपुरातील भंगार व्यावसायिक निघाला चोर

April 28, 2026 by Prakash Hande

Chandrapur Pole Theft : चंद्रपूर/धाबा:  धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोमनपल्ली ते धाबा रोडवर विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी पोल आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पिकअप वाहनासह एकूण १० लाख ८४ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (नाचत असताना पायावर पाय पडला, घरगुती कार्यक्रमात शस्त्राने हल्ला)

 

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ते २६ एप्रिल २०२६ च्या दरम्यान मौजा सोमनपल्ली परिसरातील विद्युत डीपी पोल क्रमांक १०४ हा अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी धाबा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(१), ६२, आणि ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. २६ एप्रिलच्या रात्री १२:३० वाजेच्या सुमारास पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना सोमनपल्ली-धाबा रोडवर धर्मराव भोयर यांच्या शेताजवळ एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH 34 CQ 2502) संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसून आले.

 

पोलिसांनी या वाहनाची सखोल झडती घेतली असता, कॅबीनमध्ये मोठे वायर कटर, कापडी हँडग्लोज, बॅटरी आणि कट-ऑफ व्हील्स मिळून आले. तसेच वाहनाच्या मागील भागात जाड दोरखंड आढळून आला. परिसराची पाहणी केली असता, घटनास्थळापासून ७५ मीटर अंतरावर एका डीपी जवळ लाल रंगाचा एचपी गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर नोझल, पाना आणि हातोडी असा चोरीसाठी लागणारा सर्व सामान मिळून आले. चोरट्यांनी डीपीचा पोल जमिनीपासून एक फूट उंचीवर गॅस कटरने पूर्णपणे कापला होता.

 

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब (वय ४५, रा. चंद्रपूर) धंदा भंगार दुकान आणि जमील करीम शेख (वय ३९, रा. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप, गॅस सिलिंडर, कटर, मोबाईल संच, लोखंडी पोलचे ३२ तुकडे आणि ॲल्युमिनियमच्या तारा असा एकूण १० लाख ८४ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Electric Pole Theft

 

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाबाचे ठाणेदार सपोनी सुबोध वंजारी, पोलीस हवालदार विजय महावी, अमित गुरनुले, मासूम मेश्राम, धनराज सयाम, रामेश्वर पाल, गजानन तुरेकर आणि अमोल कुळमेथे यांनी पार पाडली. या कारवाईमुळे परिसरात चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment

+