Mul Goods Yard । गडचिरोलीत रोजगार, आम्हाला नको? शोभाताई फडणवीस यांचा संघर्ष समितीला सवाल

April 26, 2026 by Prakash Hande

Mul Goods Yard : मूल - मालधक्का हटाव संघर्ष समितीने शहरातील प्रस्तावित मालधक्क्याला विरोध केला मात्र त्याउलट माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी शहरात मालधक्का व्हायला हवा याकरिता २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षरी घेत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. मालधक्का वरून व्यापारी नागरिक विरुद्ध मुख्यमंत्र्यांची काकू यांचा सामना रंगला आहे. (मालधक्का सुरु झाला तर शहराचा विनाश होणार)

 

वर्ष २०२३ मध्ये मूल शहरात मालधक्का निर्माण ची प्रक्रिया सुरु झाली होती, त्यावेळी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत मालधक्का हटाव संघर्ष समिती स्थापन करीत लढा दिला, त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्तीमुळे मालधक्का केळझर कडे स्थानांतरित करण्यात आला होता. ३ वर्षांनी मालधक्का होणार अशी चाहूल सुरु झाली, याबाबत मालधक्का हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेत आम्ही मालधक्का होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. या मालधक्क्याला माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करीत मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण पुढे करीत मालधक्का सुरु व्हावा अशी भूमिका ठेवली, शोभाताई फडणवीस यांच्या भूमिकेला संघर्ष समितीच्या सदस्यांनी विरोध केला.

 

संघर्ष समितीच्या विरोधानंतर माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मूल शहरात रोजगार निर्मिती करीता मालधक्का व्हावा अशी भूमिका मांडली, आज गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहे, तर मग आम्हाला शहरातील बेरोजगारांना रोजगार नको काय? आमच्या जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार मिळायला हवा. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना व्हावा म्हणून जमिनी द्यायला तयार आहे. मात्र काही लोक याला विरोध करताना दिसत आहे. Kaku vs Citizens Mul

 

जिल्ह्यातील २५ हजार नागरिक रोजगाराच्या बाजूने आहे, त्यांनी स्वाक्षरी सुद्धा केली आहे, मूल तालुक्यातील जवळपास ५ हजार नागरिकांनी सुद्धा मालधक्का समर्थनार्थ स्वाक्षरी केल्या आहे, आज तेंदूपत्त्याचा लिलाव झाला नाही, कारण तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागते, जंगलात वाघाची भीती आहे, या भीतीमुळे शेतकरी शेतात जायला घाबरतात, मग नागरिकांनी करायचे काय? उपाशी मरायचे काय असा पफरशन फडणवीस यांनी उपस्थित केला. राहिला मालधक्क्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न, मालधक्का झाला तर त्यासाठी बायपास रोड निर्माण होणार वाहने गावात येणारच नाही तर प्रदूषण कसले होणार. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी दिली आहे.

मूल शहरात मालधक्का व्हावा अशी भूमिका माजी मंत्री व मुख्यमंत्री यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी घेतली तर दुसरीकडे शहरातील व्यापारी, उद्योजक, नगरपालिका नगराध्यक्ष यांनी मालधक्क्याला विरोध दर्शविला आहे. येणाऱ्या काळात मालधक्क्यावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहे.

Leave a Comment

+