Tigress Dies After Attack । बछडे दिसेनात म्हणून चवताळली: वाघिणीने वनरक्षकाला केले जखमी, वाघिणीचा मृत्यू

April 26, 2026 by Prakash Hande

Tigress Dies After Attack : सिंदेवाही (चंद्रपूर) : वाघिणीने वनरक्षकावर हल्ला केला आणि अर्ध्या तासात वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रात घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वाघ जंगलात कमी तर शेतशिवारात जास्त वावर करतात त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतो. (दुचाकीची पूजा करायला गेला आणि वाघाची शिकार झाला)

 

सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील रत्नापूर शेत शिवारात आज रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, या वाघिणीने केलेल्या हल्ल्यात एक वनरक्षक गंभीर जखमी झाला असून मृत वाघिणीचे तीन बछडे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.


नवरगाव येथील मक्याच्या शेतात सकाळी १२.३० वाजताच्या दरम्यान एक बैल मृत अवस्थेत आढळून आला आणि काही अंतरावर वाघाचे पायाचे पंजे सुद्धा दिसून आल्याने त्यांनी परिसरात वाघ असून त्यानेच ही शिकार केली असावी असा अंदाज लावून सतर्क झाले. हा परिसर रत्नापूर- नवरगाव मार्गाला लागून असून रत्नापूर गावाला लागून आहे. ही वाघीण आपल्या तीन बछड्यांसह काही नागरिकांना दिसून आली होती. गावकऱ्यांनी तिला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला असता, ती रत्नापूर येथील शेत शिवारात शिरली. ही वाघीण आणि तिचे बछडे लोकवस्तीजवळ आल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक आणि वनकर्मचाऱ्यांनी वाघिणीला जंगलाच्या दिशेने परतवून लावण्याचा प्रयत्न सुरू केला त्यात वाघिणेचे तीन बछडे आपल्या आईपासून भटकले.

 

बछडे न दिसल्याने वाघीण बिथरली यामुळे चवताळून वनरक्षक सज्जन पारेकर यांच्यावर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात पारेकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.


या थरारानंतर जवळपास अर्ध्या तासातच रत्नापूर येथील शेतकरी दामोदर लोधे यांच्या गट क्रमांक १०३७ मधील उन्हाळी धानाच्या शेतात ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली. वाघिणीचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावर (सायकार), रत्नापूरचे वनरक्षक ओमप्रकाश चंहादे, नवरगावच्या वनरक्षक प्राजक्ता चौधरी, माधुरी सुरपाम, श्रीकृष्ण नागरे यांच्यासह वनकर्मचारी आणि सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


मृत वाघीण अंदाजे ९ ते १० वर्षे वयाची असून तिचे सर्व अवयव सुस्थितीत आणि शाबूत आहेत. त्यामुळे शिकारीची शक्यता प्रथमदर्शनी नाकारली गेली. वाघिणीचा मृतदेह मध्यवर्ती काष्ठ भांडार सिंदेवाही मध्ये हलविण्यात आले. यावेळी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. सोनकुसरे यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले विसाराचे नमुने काढून उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. मृत वाघिणीचे पंचासमक्ष दहन करण्यात आले. Chandrapur Tigress Death


या घटनेनंतर मृत वाघिणीसोबत असलेले तिचे तीन लहान बछडे सध्या बेपत्ता असून वनविभाग त्यांचा शोध घेत आहे. आईच्या मृत्यूमुळे हे बछडे असुरक्षित झाले असून त्यांना शोधणे वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. या घटनेमुळे परिसरात व्याघ्र दहशतीसोबतच हळहळ व्यक्त केली जात आहे. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून, दिवसा-रात्री शेतात काम करताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पिकांचे संरक्षण कसे करावे, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.

Leave a Comment

+