गोंडपिपरी एमआयडीसी विरोध करण्यासाठी चिंतलधाबा येथे जमलेले शेतकरी

गोंडपिपरी MIDC; मुनगंटीवार यांचा शेतकऱ्यांना शब्द: जिल्हाधिकाऱ्यांसोबत आठवडाभरात बैठक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 23, 2026

गोंडपिपरी: गोंडपिपरी एमआयडीसी विरोध आता तीव्र झाला असून प्रस्तावित एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी (२२ नोव्हेंबर) चिंतलधाबा येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीसाठी ९०० ते हजार शेतकरी जमले होते. (मानधनावर प्राचार्याचा डोळा, आयटीआय प्राचार्य कल्पना खोब्रागडे एसीबीच्या ताब्यात, वाचा सविस्तर)

मुनगंटीवार यांनी आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि त्यानंतर उद्योगमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

आमच्या जमिनीवर आमचा हक्क असून आमच्या इच्छेविरुद्ध सुपीक शेतजमिनीचा एक इंचही ताबा घेऊ देणार नाही, प्रस्तावित एमआयडीसीची मान्यता रद्द करावी, अशी ठाम भूमिका गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या लढ्याला आता नवे बळ मिळाले असून, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेण्यासाठी रविवारी (ता. २२) चिंतलधाबा येथील नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल ९०० ते हजार शेतकरी एकवटले होते. शेती हीच आमची मायबाप असून ती वाचवण्यासाठी आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, अशी साद शेतकऱ्यांनी घातली असता, आपण कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा शब्द मुनगंटीवारांनी दिला.

गोंडपिपरी एमआयडीसी विरोध: १२ गावांतील शेतकरी का एकवटले?

गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीमध्ये करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चेक वडकुली, सिरसी देऊळवार, चेक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा आणि खराळपेठ या १२ गावांचा समावेश आहे. या भागातील जमीन सुपीक असून शेती हाच कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली सुपीक जमिनीवर संकट येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष धुमसत आहे. याच पार्श्वभूमीवर गोंडपिपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समिती आणि शेतकरी एकता संघर्ष समितीच्या वतीने एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याची मागणी करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, असा आग्रहही यावेळी धरण्यात आला.

यापूर्वी या प्रश्नावर विविध आंदोलने, निवेदने तसेच न्यायालयीन लढाही उभारण्यात आला असून, न्यायालयाकडून सध्या ‘स्टेटस को’ मिळाला आहे आणि या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र, १८ नोव्हेंबरपासून तालुक्यात सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर या संघर्षाला गंभीर वळण लागले. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही जबरदस्तीने मोजणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून माहिती दिली. त्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय जबरदस्तीने मोजणी करता येणार नाही, अशी भूमिका घेत मुनगंटीवारांनी अधिकाऱ्यांना मोजणी थांबवण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर सर्वेक्षण थांबले. आपली व्यथा ऐकली जाईल आणि न्याय मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी रविवारी चिंतलधाबा येथे मोठी गर्दी करत आपल्या भावना, संताप आणि मागण्या मांडल्या.

एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याचा मुद्दा विधानसभेत ठामपणे उपस्थित करावा, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे आणि शासनस्तरावर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावर प्रतिसाद देताना मुनगंटीवार यांनी आठवडाभराच्या आत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आणि त्यानंतर उद्योगमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून कोणत्याही शेतकऱ्यावर जोरजबरदस्ती केली जाणार नाही, असा शब्द देत शेतकऱ्यांच्या भावना आणि निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी १२ गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने औद्योगिक कृती संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुरज माडूरवार यांनी प्रास्ताविकातून गावकऱ्यांची भूमिका, जमिनीचे महत्त्व आणि एमआयडीसीला असलेला विरोध स्पष्ट केला. या प्रसंगी शेतकरी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष मारोती भोयर, सचिव माधव लडके, सुदर्शन दुर्गे, अमित भसारकर, औद्योगिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय वडसकर, कल्पेश खरबनकर, संदेश निमगडे, गजानन ढवस, संतोष निकोडे यांच्यासह १२ गावांतील समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment