चंद्रपूर – दिव्यांगांना साहित्य वाटप करून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात स्व. प्रभाताई जोरगेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गांधी चौकातील भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधून त्यांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेतल्या. (विद्युत कुंपणाने घेतला अस्वलाचा जीव, चिमूर तालुक्यातील घटना, वाचा बातमी)
आई ही केवळ कुटुंबाचा आधार नसते, तर ती माणुसकी, संवेदनशीलता आणि सेवाभावाचे संस्कार देणारी प्रेरणाही असते. स्व. प्रभाताई जोरगेवार यांनी दिलेले संस्कार आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलतेची शिकवण आजही आपल्या कार्याला दिशा देत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गरजूंच्या चेहर्यावर आनंद फुलविणे आणि त्यांच्या आयुष्यात आधार निर्माण करणे होय. दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याचा हा प्रयत्न म्हणजे मातोश्रींच्या स्मृतींना वाहिलेली खरी आदरांजली आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
दिव्यांगांना साहित्य वाटप; किशोर जोरगेवारांचा सेवाभावी उपक्रम
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. प्रभाताई जोरगेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, दिनकर सोमलकर, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, अनुसुचित जाती अध्यक्ष विमल कातकर, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, प्रलय मशाखेत्री, श्याम धोपटे, नगर सेविका आशा देशमुख, नगर सेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पूढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. मात्र, दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या जीवनातील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी मदतीचा हात देणे ही समाजाची जबाबदारी आहे. मदत ही केवळ वस्तू देण्यापुरती मर्यादित नसावी, तर त्यातून संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे.
स्व. प्रभाताईंच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, आईकडून मिळालेले संस्कार माणसाच्या आयुष्यभर सोबत असतात. दुसर्याच्या दुःखाची जाणीव ठेवणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी माणुसकी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ स्मृतिदिनापुरता मर्यादित नसून सेवाभावाची ही परंपरा पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे.
दिव्यांग बांधवांच्या चेहर्यावर उमटणारे समाधान आणि त्यांच्या जीवनात निर्माण होणारी सुलभता हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाची वाटचाल झाली पाहिजे. विशेषतः दिव्यांग बांधवांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्या सुविधा मिळण्यासाठी समाजानेही संवेदनशीलतेने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्व. प्रभाताईंच्या स्मृतींना अभिवादन करताना समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यामागे आहे. गरजूंच्या मदतीसाठी आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी असे सेवाभावी उपक्रम यापुढेही सुरू राहतील, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
यावेळी दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांच्या जीवनात आधार आणि आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम स्व. प्रभाताई जोरगेवार यांच्या स्मृतींना सेवेतून वाहिलेली आदरांजली ठरला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






