Chandrapur urea supply update
Chandrapur urea supply update : चंद्रपूर, दि. 21 : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून खत टंचाईची समस्या सुटणार असून, शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतटंचाईची चिंता वाढली आहे. पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात HURL कंपनीचे 1250 मेट्रिक टन आणि NBCL (नर्मदा) कंपनीचे 1600 मेट्रिक टन युरिया खत लवकरच उपलब्ध होणार आहे. बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन किसान मोर्चाच्या विनंतीनंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यालयात खत उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. Sudhir Mungantiwar fertilizer planning
चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार
बैठकीला कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पवार, बल्लारपूरचे गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड, पोंभुर्णाचे गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गवळी, चंद्रपूरच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्रीमती गोडबोले, मूलच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गजभिये, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, भाजपा किसान महानगर मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रवी चहारे आदींची उपस्थिती होती.
वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करा
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘युरिया खताचे वाटप काटेकोर नियोजनानुसार प्रत्येक कृषी केंद्रावर तसेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करा. याशिवाय प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करावे. दरम्यान, आजच्या तारखेस मूल तालुक्यात फक्त 2.5 टन खत उपलब्ध असून पोंभुर्णा येथे एकही युरियाची बॅग उपलब्ध नाही, ही गंभीर बाब आहे.’
शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामी गरजा लक्षात घेता खत उपलब्धतेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.