चंद्रपूर – (Khalsa Help Foundation) च्या पुढाकारातून चंद्रपूरात छायादार आणि फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच हजूर साहिब गुरुद्वारा कायद्यातील प्रस्तावित बदलांविरोधात शीख समाजाने शासनापर्यंत शांततेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
खालसा हेल्प फाऊंडेशनतर्फे १ जुलै २०२६ रोजी छायादार व फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश केवळ पर्यावरण संवर्धन नसून, शीख समाजाच्या भावना व मागण्या शांततापूर्ण मार्गाने शासनापर्यंत पोहोचविणे हाही होता. (चंद्रपुरात होणार रिंग रोड)
फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून श्री हजूर साहिब गुरुद्वारा समिती, नांदेड संदर्भात शासनाकडून प्रस्तावित करण्यात येत असलेल्या बदलांमुळे शीख समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासन १९५६ चा हजूर साहिब कायदा रद्द करून नवीन कायदा लागू करण्याच्या तयारीत असून, त्यामध्ये शासनाकडून काही सदस्य व पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
Khalsa Help Foundation उपक्रमामुळे काय संदेश गेला?
खालसा हेल्प फाऊंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शीख गुरूंनी देश, समाज आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. शीख धर्म नेहमीच बंधुता, प्रेम आणि सेवाभावाचा संदेश देत आला आहे. त्यामुळे आंदोलन किंवा निदर्शने करण्याऐवजी वृक्षारोपण व रोपवाटपाच्या माध्यमातून शासनापर्यंत आपली भूमिका शांततेत पोहोचविण्याचा हा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमात सरदार तेजिंदरसिंग दारी, अर्जुनसिंग धुपिया, बलबीरसिंग बग्गा, गुरजीतसिंग गडांक, प्रहलादसिंग जुनेजा, सोनू अनेजा, नितीनसिंग बावरे, हरदीपसिंग साहनी, गुरप्रीतसिंग नारंग, महेंद्रसिंग साहनी यांच्यासह शीख समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक श्री पप्पू देशमुख तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायडू यांनीही शीख समाजाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित नवीन कायद्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी शीख समाजाच्या भावनांशी एकात्मता व्यक्त केली. धार्मिक संस्थांशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाजाच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या श्रद्धा व परंपरांचा आदर राखला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा श्रीमती मनस्वी संदीप गिरहे यांनीही आपल्या उपस्थितीची नोंद देत शिवसेनेच्या वतीने शीख समाजाला आपला पाठिंबा दर्शविला तसेच सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी खालसा हेल्प फाऊंडेशनने शासनाला शीख समाजाच्या भावना लक्षात घेऊन प्रस्तावित बदलांचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजहित आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या सकारात्मक माध्यमातून लोकशाही मार्गाने शासनापर्यंत आपली भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न भविष्यातही सुरू राहील, असे फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






