अवैध सागवान जप्त: विरुर वनपरिक्षेत्रात जप्त ट्रॅक्टर आणि सागवान लाकडे

शेतात लपवलेले सागवान; तिघांवर वनगुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 6, 2026

चंद्रपूर: अवैध सागवान जप्त करण्याची कारवाई मध्य चांदा वनविभागाच्या विरुर वनपरिक्षेत्रात करण्यात आली. देवाडा उपक्षेत्रात गस्तीवर असलेल्या वनअधिकाऱ्यांनी एका संशयित ट्रॅक्टरची तपासणी केली. तपासणीत ट्रॉलीमध्ये सागवान लाकडे आढळली. त्याबाबत परवाना किंवा कागदपत्रे सादर न झाल्याने ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनविभागाच्या माहितीनुसार, ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी झाली. तिघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वेकोलि कार्यालयात चाकू हल्ला, वाचा बातमी)

मध्य चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या विरुर वनपरिक्षेत्रातील देवाडा उपक्षेत्रामध्ये गस्तीवर असलेल्या वनधिकाऱ्यांनी एका संशयीत ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर अवैध सागवान लाकडे आढळून आली. या प्रकरणी ट्रॅक्टर आणि लाकडासह तिघा संशयितांवर वनअधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध सागवान जप्त: गस्तीवेळी ट्रॅक्टर तपासणीत उघड

प्राप्त माहितीनुसार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी विरुर वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र देवाडा येथे वनधिकारी नियमीत गस्त घालीत होते. यादरम्यान त्यांना एक संशयीत ट्रॅक्टर आढळून आला. वनधिकाऱ्यांनी तत्काळ तो ट्रॅक्टर थांबवून कसून तपासणी केली असता, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील वनउत्पादनाची खात्री पटली आणि त्यात बेकायदेशीर सागवानाची लाकडे असल्याचे उघडकीस आले. या ट्रॅक्टर व सागवान लाकडाबाबत चालकाकडे व उपस्थितांकडे शासकीय कागदपत्रे तसेच अधिकृत परवान्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, आरोपी बळीराम शंकर मल्लेलवार आणि कुंदन एकनाथ मडावी यांनी कसलेही कागदपत्र किंवा परवाना सादर न करता असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे अवैध असल्याचे स्पष्ट झाल्याने वनधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाहतूक केली जाणारी सागवान लाकडे असा ऐन मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सदर सागवानाची लाकडे आरोपी क्र. ३ उध्दव नामदेव उबाडे (रा. पुनागुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर) याच्या शेतात लपवून ठेवण्यात आलेली होती आणि ती त्याच्याकडूनच खरेदी केल्याची महत्त्वाची कबुली दिली. याप्रकरणी तिन्ही संशयितांविरोधात दिनांक ४ नोव्हेंबर रोजी वनअपराध क्रमांक ०८९०१/२२२५०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी बळीराम शंकर मल्लेलवार, कुंदन एकनाथ मडावी आणि उध्दव नामदेव उबाडे यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१)(F), ५२(१), ४१ व ४२(१) चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर यशस्वी कारवाई मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये आणि राजुराचे उपविभागीय वनधिकारी मंगेश डी. गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश बी. दिघे व इतर वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली. परिसरातील अवैध वृक्षतोड व तस्कराविरोधात वनविभागाने उचललेल्या या कडक पावलामुळे गोदामांमध्ये आणि जंगलात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रकरणाचा पुढील तपास वनविभाग करीत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment