चंद्रपूर, ६ नोव्हेंबर २०२६ : घुग्घुस मार्ग अपघात शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-घुग्घुस रस्त्यावर घडला. प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीला ट्रकने मागून धडक दिली. त्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी हे तरुण गावी निघाले होते. या मार्गावर पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू असल्याने रस्त्याची एक बाजू बंद आहे. दोन्ही दिशांची वाहतूक एकाच बाजूने सुरू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. (चंद्रपूरच्या वेकोलि कार्यालयात चालला चाकू, एक गंभीर जखमी, वाचा बातमी)
घुग्घुस मार्ग अपघात कसा घडला?
दिवाळीच्या आनंदाला आणि सणाच्या तयारीला काळी किनार फाडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर घडली. सुरजागड ते घुग्घुस येथील ‘लॉयडस मेटल’ कंपनीच्या पाईपलाईन उत्खननामुळे चंद्रपूर- घुग्घुस जाणारा मार्ग बंद करून घुग्घुस कडे जाणाऱ्या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याच्या प्रकारामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी जाण्यासाठी काही युवक सकाळीच आपापल्या कपड्यांच्या बॅग्ज घेऊन घुग्घुस वरून चंद्रपूरच्या दिशेने दुचाकीने निघाले होते. दरम्यान, घुग्घुस-चंद्रपूर मार्गावर ‘लॉयडस मेटल’ कंपनीतर्फे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्यामुळे उफाळलेली माती रस्त्यावर पसरली आहे. परिणामी, सुरक्षेचा बोजवारा उडवत रस्त्याचा एक बाजूचा मार्ग पूर्णपणे बंद केला असून, संपूर्ण वाहतूक एकाच मार्गावरून (दुहेरी वाहतूक) सुरू ठेवण्यात आली आहे.
घुग्घुस मार्ग अपघात : दोन ट्रक आणि दुचाकीची धडक: प्राथमिक माहिती
सकाळी नेमक्या याच वर्दळीच्या आणि धोक्याच्या वेळी हे तीन युवक पांढरकवडा परिसराजवळ पोहोचले असता, मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने (ट्रक चालकाच्या बेदरकार आणि अतिवेगाने) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
घुग्घुस मार्ग अपघात : ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुण हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर काळाने जणू त्यांच्यावर घालाच घातला. मागून धडक देणाऱ्या ट्रकची चाके एका युवकाच्या अंगावरून निघून गेली, तर त्याच वेळी समोरून (चंद्रपूरच्या दिशेने) येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची चाके दुसऱ्या युवकाच्या अंगावरून गेल्याने दोन्ही युवकांचा जागीच व अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. तिसरा युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवर जाऊन फेकला गेला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेत युवकांची दुचाकी चक्काचूर झाली असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
विशेष म्हणजे, निष्पाप युवकांना चिरडल्यानंतरही त्या दोन्ही क्रूर ट्रक चालकाने आपले वाहन घटनास्थळी न थांबवता आणखी वेगाने पळवून नेले. या अपघातानंतर मार्गावरून जाणाऱ्या इतर संवेदनशील वाहनचालकांनी व नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने गंभीर जखमी व मृत युवकांना वाहनात टाकून उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवले. गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या युवकावर सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घुग्घुस मार्ग अपघात – कंपनी आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
एखाद्या खाजगी कंपनीच्या व्यावसायिक आणि औद्योगिक फायद्यासाठी अतिवर्दळ असलेल्या मुख्य मार्गावर कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था न ठेवता रस्ता बंद करणे आणि दुहेरी वाहतुकीचा भार लादणे थेट नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. अपघातानंतर दुसरा मार्ग सुरु करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली, कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या मूक संमतीमुळे दिवाळीच्या उंबरठ्यावर असताना दोन तरुण मुलांचे मृतदेह घरी जाण्याऐवजी शवविच्छेदनासाठी गेल्याने सर्वत्र संताप आणि शोककळा पसरली आहे. या प्रकरणी दोषी ट्रक चालकावर आणि संबंधित कंपनीच्या बेजबाबदार कारभारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







