चंद्रपूर – चंद्रपूर बिनबा गेट अपघातात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. २८ सप्टेंबरच्या रात्री दुचाकीसमोर अचानक डुक्कर आडवे आले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून तिघे रस्त्यावर पडले. तिसरा तरुण गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
तिघेही मित्र चिंचाळा येथून चंद्रपूर शहराकडे येत होते. शांतीधाम जवळील कुमार ट्रान्सपोर्टसमोर हा अपघात झाला. मृत आणि जखमी तिघेही बालाजी वॉर्डातील रहिवासी आहेत. रामनगर पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. (गणेश विसर्जन मिरवणुकीत राडा, वाचा हि बातमी)
शहरानजीकच्या बिनबा गेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. वेगात असलेल्या दुचाकीसमोर अचानक डुक्कर आडवे आल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बालाजी वॉर्ड परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर बिनबा गेट अपघात नेमका कसा घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास बालाजी वॉर्डात राहणारे तीन मित्र दुचाकीने (क्रमांक MH ३४ BU ६७५२) चिंचाळा येथून चंद्रपूर शहराकडे येत होते. वाहनाचा वेग जास्त असतानाच, शांतीधाम जवळील कुमार ट्रान्सपोर्टसमोर अचानक एक डुक्कर रस्त्यावर आडवे आले. वेगातील दुचाकीची डुकराला जोरदार धडक बसली, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालवणारा रोहित मनोज शिंदे (वय २८) आणि मयंक अनुप शर्मा (वय ३०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा तिसरा मित्र साहिल महादेव बुरडकर (वय २०) हा गंभीर जखमी झाला.
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याची धडपड केली. मात्र, वैद्यकीय तपासणीपूर्वीच दोघांची प्राणज्योत मालवली होती. गंभीर जखमी साहिल बुरडकर याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकत्र फिरणाऱ्या तीन जिवाभावाच्या मित्रांपैकी दोघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बालाजी वॉर्डात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






