मूल: मूल गडचिरोली महामार्ग अपघात गुरुवारी रात्री आकापूर गावालगतच्या वळणावर घडला. यात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मोहित मधुकर चौधरी (३२, रा. नवेगाव चक) आणि गणेश राजू येसनसुरे (३१, रा. सिंदेवाही) अशी मृतांची नावे आहेत. रात्री सुमारे ९ वाजता दोघे मूलहून सावलीच्या दिशेने जात होते. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी लोखंडी बेरीकेटवर आदळली. धडक एवढी जोरदार होती की बेरीकेट कोसळले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (चंद्रपुरात कुंटणखाना, एलसीबी ची धाड. वाचा हि बातमी)
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित आणि गणेश हे दोघे आपल्या दुचाकीने (क्र. MH-34-BY-7678) मूल येथून सावलीच्या दिशेने जात होते. आकापूरजवळील वळण मार्गावर आले असता, वेगात असलेल्या दुचाकीवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी बेरीकेटवर जाऊन जोरदार धडकली. धडक एवढी भीषण होती की लोखंडी बेरीकेट कोसळले आणि दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
वेग नियंत्रणात नसल्याने घडला अपघात?
दोन्ही दुचाकीस्वारांनी मूलच्या बाजूने असलेले पहिले चार बेरीकेट सुरक्षितपणे पार केले होते. मात्र, वळणावर पुढे गेल्यावर आकापूरच्या दिशेने असलेल्या बेरीकेटला त्यांची गाडी धडकली. त्यामुळे दुचाकीचा वेग खूप जास्त असावा आणि वळणावर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अपघातप्रवण वळणावर दीर्घकाळानंतर दुर्घटना
आकापूर जवळील हे वळण अत्यंत धोकादायक आणि अपघातप्रवण मानले जाते. यापूर्वी येथे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन काहींचा मृत्यूही झाला आहे. अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने या वळणाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी बेरीकेट लावले होते. बेरीकेट लावल्यापासून येथे अपघातांचे प्रमाण पूर्णपणे थांबले होते; मात्र गुरुवारी रात्री घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






