चंद्रपूरमधील बिनबा गेट अपघात झालेल्या परिसरातील रस्ता

चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डातील तीन मित्रांचा एकाच अपघातात अंत; नागपूरमध्ये उपचार घेणाऱ्या साहिलचे निधन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 9, 2026

चंद्रपूर : बिनबा गेट अपघात – चंद्रपूर शहरालगतच्या बिनबा गेट परिसरात २८ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या भीषण दुचाकी अपघातातील तिसऱ्या गंभीर जखमी तरुणाचाही गुरुवारी मध्यरात्रीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. साहिल महादेव बुरडकर (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर नागपूर येथील निम्स (NIMS) रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवल्याने या अपघातातील मृतकांची संख्या आता तीन झाली असून, संपूर्ण बालाजी वॉर्ड परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. (सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू, अशी घडली घटना, वाचा हि बातमी)

२८ सप्टेंबरच्या रात्री नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बालाजी वॉर्डातील तीन मित्र दुचाकीने (क्र. एम.एच. ३४ बी.यू. ६७५२) चिंचाळा येथून चंद्रपूर शहराकडे परत येत होते. दरम्यान, शांतीधाम परिसरातील कुमार ट्रान्सपोर्टसमोर अचानक एक डुक्कर रस्त्यावर आडवे आले. भरधाव दुचाकीची डुकराला थेट धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिघेही मित्र रस्त्यावर जोरदार फेकले गेले.

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचालक रोहित मनोज शिंदे (वय २८) आणि मयंक अनुप शर्मा (वय ३०) या दोघांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला होता. तर साहिल बुरडकर हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूरच्या निम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु गुरुवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.

नेहमी एकत्र फिरणाऱ्या आणि लहानाचे मोठे झालेल्या तीन तरुण मित्रांचा एकाच अपघातात असा दुर्दैवी अंत झाल्याने तिन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन मित्रांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत नसतानाच आता साहिलच्याही मृत्यूची बातमी धडकल्याने बालाजी वॉर्डातील नागरिक सुन्न झाले आहेत. या दुर्घटनेमुळे रात्रीच्या वेळी वाहनावरील वेगावर नियंत्रण ठेवणे आणि रस्त्यावरील अचानक उद्भवणाऱ्या धोक्यांबाबत सतर्क राहणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment