चंद्रपूर: चंद्रपूर पेट्रोल पंप : केंद्र व राज्य शासनाचे स्पष्ट आदेश तसेच तेल कंपन्यांचे नियम धाब्यावर बसवून चंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांना मिळणाऱ्या मूलभूत जनसुविधा नाकारून त्यांची सर्रास आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बेकायदेशीर कारभाराविरोधात ‘ग्राहक संरक्षण समिती’ आणि ‘शिवसेना भारतीय कामगार संघटना’ यांच्या वतीने आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना सविस्तर कायदेशीर निवेदन देऊन धडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. येत्या ७ दिवसांत दोषी पेट्रोल पंप चालकांवर कडक कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन तसेच प्रत्येक पंपावर ‘भगवी तक्रार पेटी’ आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा शिवसेना तालुका प्रमुख व ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी दिला आहे. (बिनबा गेट अपघातातील तिसऱ्या तरुणाचा मृत्यू, वाचा बातमी)
कायद्याचा आणि नियमांचा उघडपणे भंग
पेट्रोल पंप चालकांना (डीलर्स) परवाना देताना आणि प्रतिलिटरमागे भरघोस कमिशन देताना ग्राहकांना ६ मूलभूत सुविधा विनामूल्य, अखंडित आणि स्वच्छ स्थितीत देणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाचे ‘डीलर सिलेक्शन गाईडलाईन २०२३’ (१.२ g), ऑईल कंपन्यांचे ‘मार्केटिंग शिस्त नियम २०२३’ (MDG), युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (USO) आदेश, मोटर स्पिरिट व हाय स्पीड डिझेल आदेश २००५, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, वैधमापन शास्त्र कायदा २००९ आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ (कलम २-४७) चा स्पष्ट आधार आहे. नियमानुसार सुविधा न देणे हा ‘अनुचित व्यापार प्रथा’ (Unfair Trade Practice) अंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. अलीकडेच कोझिकोड येथील ग्राहक आयोगाने सुविधा न देणाऱ्या पंपावर तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा दाखलाही निवेदनात देण्यात आला आहे.
प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक वास्तव उघड
ग्राहक संरक्षण समिती व शिवसेनेच्या संयुक्त पथकाने वरोरा, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर शहरातील ५० पेक्षा जास्त पेट्रोल पंपांची प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण केले असता अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
- पाण्याची अनुपलब्धता: तब्बल ९९% पंपांवर पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही किंवा वॉटर फिल्टरच्या नळांना कुलूप ठोकलेले आढळले.
- अस्वच्छ शौचालये व मानवी हक्कांची पायमल्ली: महिला व पुरुषांची शौचालये अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी “बंद आहे” चे बोर्ड लावून कुलूप लावले जाते. विशेषतः महिला ग्राहकांना शौचालय वापरण्यास थेट नकार दिला जात असून ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे.
- हवेच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली: सर्वात मोठा गैरप्रकार म्हणजे कंपन्यांनी दिलेले मोफत एअर कॉम्प्रेसर मुद्दाम बंद ठेवून, पंपाच्या आवारातच खाजगी व्यक्तींना जागा भाड्याने देण्यात आली आहे. तिथे ग्राहकांकडून हवेसाठी १० ते ३० रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहेत, जो परवाना रद्द ठरण्याजोगा गंभीर गुन्हा आहे.
- तक्रार पुस्तक नाकारणे: ग्राहकांनी तक्रार नोंदवण्यासाठी ‘तक्रार पुस्तक’ (Complaint Book) मागीतल्यास त्यांना कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ करून हाकलून दिले जाते.
प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
१) ७ दिवसांत अचानक तपासणी: पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र आणि संबंधित तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त त्रिसदस्यीय समिती स्थापन करून जिल्ह्यातील सर्व पंपांची तात्काळ अचानक तपासणी करण्यात यावी.
२) मराठी माहिती फलक सक्तीचा करा: प्रत्येक पंपावर “येथे सर्व जनसुविधा मोफत आहेत – तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांकावर (IOCL: 1800-2333-355, BPCL: 1800-22-4344, HPCL: 1800-22-3030) संपर्क साधा” असा स्पष्ट मराठी फलक लावण्यात यावा.
३) दंडात्मक कारवाई व विक्री बंदी: पैसे घेऊन हवा भरणाऱ्या आणि सुविधा नाकारणाऱ्या पंपांवर नियमानुसार ५०,० हजार रुपयांचा दंड आकारून पहिल्या टप्प्यात १५ दिवसांसाठी इंधन विक्री व पुरवठा बंद करण्यात यावा.
४) अहवाल जाहीर करा: करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत जनहितार्थ प्रसारमाध्यमांना लेखी स्वरूपात कळवण्यात यावा.
“७ दिवसांत कारवाई करा, अन्यथा भगवी तक्रार पेटी आंदोलन!”
या प्रसंगी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्ष संतोष लिलाबाई दशरथ पारखी म्हणाले की, “पेट्रोल पंप चालकांना मिळणारे कमिशन हे ग्राहकांना सेवा देण्यासाठी असते, स्वतःचे खिसे भरण्यासाठी नाही. जर ७ दिवसांत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने या लुटारू पंप चालकांवर धाडी टाकून कडक कारवाई केली नाही, तर शिवसेना आणि ग्राहक संरक्षण समिती लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करेल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘भगवी तक्रार पेटी’ लावून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






