Bhadrawati Road Accident caused by severe potholes in Pimpri Mursa Road

डोळ्यांच्या उपचारासाठी निघालेल्या वृद्ध महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 29, 2026

भद्रावती: Bhadrawati Road Accident मध्ये एका निष्पाप वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नातवासोबत जात असताना मुरसा-पिंपरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून हा अपघात झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ताईबाई बोबडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांमध्ये आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. (हे हि वाचा – कुटुंब परगावी आणि चोरांनी साधला डाव)

प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अखेर एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतले आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी निघालेल्या वृद्ध महिलेचा खड्डेमय रस्त्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ताईबाई कोंडाबा बोबडे (रा. पिंपरी देश) असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

दि. २५ ऑगस्ट रोजी ताईबाई बोबडे या डोळ्यांच्या उपचारासाठी आपल्या नातवासोबत दुचाकीने निघाल्या होत्या. मुरसा–पिंपरी मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यामध्ये ताईबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जनआंदोलनांना केराची टोपली मुरसा–पिंपरी–भद्रावती या मार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून चाळण झाली आहे. या मार्गाच्या तातडीने डांबरीकरणासाठी आणि दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा निदर्शने, मोर्चे, आंदोलने आणि उपोषणे केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.

सत्ताधारी-विरोधकांच्या कार्यक्षेत्रात रस्त्यांची दुर्दशा

विशेष बाब म्हणजे, हा परिसर भाजपचे स्थानिक आमदार करण देवतळे यांच्या विधानसभा मतदारसंघात आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा क्षेत्रात येतो. एकीकडे सत्ताधारी भाजपचे आमदार आणि दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार असे दोन्ही प्रमुख पक्षांचे लोकप्रतिनिधी असतानाही, सामान्य जनतेच्या मूलभूत अशा रस्त्याच्या समस्येकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. “आमदार आणि खासदारांच्या कार्यक्षेत्रात जर रस्त्यांची ही दैना असेल, तर दाद कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

‘आणखी किती बळी घेणार?’ — जनतेचा संतप्त सवाल वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळेच हा निष्पाप जीव गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment