भद्रावती/नवरगाव (चंद्रपूर): (Chandrapur Accident News) चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी दोन अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडले असून, या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूर–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडपेठ परिसरात एका ज्येष्ठ कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे रस्ता ओलांडताना ई-रिक्षेच्या धडकेत अडीच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. (हे हि वाचा – केंद्रीय मंत्र्यांचा बनावट व्हिडीओ, थेट लाखोंची फसवणूक)
Chandrapur Accident News : घोडपेठ आणि नवरगावात काळाचा घाला
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास अनिल बावणे हे त्यांच्या ऍक्टिव्हा दुचाकीने (क्रमांक MH-34-CS-7875) नागपूर–चंद्रपूर मार्गाने प्रवास करत होते. घोडपेठ परिसरात पोहोचले असता, महामार्गावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त विखुरलेल्या गिट्टीच्या चुरीमुळे त्यांच्या दुचाकीचा ताबा अचानक सुटला आणि दुचाकी रस्त्यावरच जोरदार घसरली. दुर्दैवाने त्याच वेळी त्यांच्या मागून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने (क्रमांक RJ-17-CB-3519) त्यांना चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी बावणे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट परिधान केलेले होते, मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की हेल्मेट असूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
दरम्यान, नागपूर–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी जीवघेणे मोठे खड्डे पडले असून दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्यावर विखुरलेली गिट्टी दुचाकीस्वारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. या अत्यंत धोकादायक परिस्थितीमुळेच अनिल बावणे यांना आपला प्राण गंवावा लागल्याची संतप्त चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेनंतर महामार्गावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवून रस्त्यावरील गिट्टी तात्काळ हटवावी, तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून भद्रावती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दूसरी अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील महादेव मोहल्ल्यात रविवारी दुपारीच घडली, जिथे रस्ता ओलांडत असताना एका अडीच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा ई-रिक्षेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. महादेव मोहल्ला येथील स्थानिक रहिवासी महेश गहाणे यांची एकुलती एक अडीच वर्षीय मुलगी श्रिजा महेश गहाणे ही घरासमोरील रस्ता ओलांडत असताना अचानक रस्त्याने जाणाऱ्या एका मालवाहू ई-रिक्षेला जोरदार धडकली. या अनपेक्षित अपघातात ती ई-रिक्षाच्या थेट चाकाखाली आल्याने तिच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी तातडीने धाव घेऊन तिला स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात येत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर चिमुकलीचे प्रेत घरी आणताच नातेवाईक व नागरिकांनी एकच टाहो फोडला, आई-वडिलांच्या या एकुलत्या एक मुलीच्या अचानक जाण्याने गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नवरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, अपघातग्रस्त ई-रिक्षासह चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






