Chandrapur NEET Protest movement outside collector office

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चंद्रपूरकर मैदानात; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 19, 2026

चंद्रपूर: (Chandrapur NEET Protest) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळातील NEET परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ चंद्रपुरात मोठे आंदोलन छेडण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध विद्यार्थी, सामाजिक, धार्मिक, आंबेडकरी, पुरोगामी आणि राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका भव्य ‘लक्षवेध निदर्शनीय आंदोलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. (हे हि वाचा – परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी होणार)

Chandrapur NEET Protest : आंदोलनाचे मुख्य कारण काय?

या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे अत्यंत महत्त्वाच्या मागण्या लावून धरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने NEET परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाची संपूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, देशातील विद्यार्थीहिताला बाधा आणणाऱ्या सद्यस्थितीतील शैक्षणिक धोरणांचा शासनाने पुनर्विचार करावा, भविष्यात परीक्षांमध्ये कोणतीही गोपनीयता भंग होणार नाही अशी पारदर्शक, न्याय्य व पूर्णतः विद्यार्थी-केंद्रित परीक्षा प्रणाली तातडीने अंमलात आणण्यात यावी, तसेच देशातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

यासोबतच, देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या संरक्षणासाठी आणि विविध शैक्षणिक सुधारणांसाठी सातत्याने आग्रही भूमिका मांडणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनालाही या प्रसंगी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या सर्व प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन प्रविण खोबरागडे, देशक खोब्रागडे, अशोक टेंभरे, अशोक फुलझेले, किशोर तेलतुमडे, अनंत बाबरे, सुरेश नारनवरे, पप्पूभाऊ देशमुख, नंदू नगरकर, अनवर अली, किशोर पोतनवार, विजय नळे, नामदेव कन्नाके, प्रतीक डोर्लीकर, एड. राजस खोब्रागडे, दिलीप डांगे, एड. विलास माथनकर, प्रतीक्षा येरगुडे, आर्कि. राजेश रंगारी, अंकिता रोडगे, पोषणा बेताल, चांरिका भगत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, सामाजिक, धार्मिक, आंबेडकरी व राजकीय संघटनांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment