Chandrapur Police Verification

चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करा; दिनेश चोखारे यांची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 19, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर (Chandrapur Police Verification) अत्यंत आवश्यक झाले आहे. काँग्रेसचे कामगार नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी कंत्राटी आणि परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी बंधनकारक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना याबाबतचे विशेष निवेदन सोपवले. या परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (दिलीप यादव मृत्यू प्रकरणात आता सीआयडी ची एंट्री)

Chandrapur Police Verification : गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

निवेदनात म्हटले आहे की, पडोली, ताडाळी, घुघुस व एमआयडीसी परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी तसेच परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. औद्योगिक क्षेत्रात वाढत्या कामगारांच्या संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अधिक दक्षता घेणे आवश्यक झाले असून, अलीकडील काळात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित कामगारांची ओळख, कायमस्वरूपी पत्ता तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलीस पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे चोखारे यांनी निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक कंत्राटी तसेच परप्रांतीय कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्यपणे करून घ्यावे, याबाबत पोलीस प्रशासनामार्फत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे.

तसेच, ज्या कंपन्यांनी अद्याप त्यांच्या कामगारांची पोलीस पडताळणी केलेली नाही, अशा कंपन्यांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

जनहित, नागरिकांची सुरक्षितता आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी अपेक्षाही चोखारे यांनी व्यक्त केली आहे.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे विविध राज्यांतील कामगार मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत होत असून, त्यांच्या नोंदी व पोलीस पडताळणीची प्रभावी यंत्रणा उभारल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे, संशयित व्यक्तींचा मागोवा घेणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे अधिक सुलभ होईल, असा विश्वासही दिनेश दादापाटील चोखारे यांनी व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment