चंद्रपूर : चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरात Tadali MIDC Pollution Case मुळे खळबळ उडाली आहे. विमला सायडिंग मधील कथित निकृष्ट दर्जाच्या कोळशाची साठवणूक आणि वायू प्रदूषणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी यासंदर्भात मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी केली होती. (रस्त्याचे काम रखडले, मनपा आयुक्त ऑन द स्पॉट)
Tadali MIDC Pollution Case संदर्भात काँग्रेस नेत्यांचे मंत्र्यांना निवेदन
एमआयडीसी ताडाळी (ता. जि. चंद्रपूर) येथील विमला सायडिंगमध्ये कथित निकृष्ट दर्जाच्या अथवा भेसळयुक्त कोळशाची हाताळणी, साठवणूक व वाहतूक, वाढते वायू व धूळ प्रदूषण, पर्यावरणीय नियमांचे संभाव्य उल्लंघन, आवश्यक वृक्षलागवडीचा अभाव तसेच परिसरातील शेतीचे होत असलेले नुकसान या गंभीर बाबींची उच्चस्तरीय, निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे कामगार नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिनेश दादापाटील चोखारे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनाची दखल घेत मंत्री पंकजाताई मुंडे यांनी संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल व वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिनेश चोखारे यांना दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विमला सायडिंग परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळशाची हाताळणी, साठवणूक आणि वाहतूक होत असल्याने वायू व धूळ प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली असून स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. कोळशाची धूळ शेतजमिनींवर साचत असल्याने पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे आणि शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून वैज्ञानिक पद्धतीने नुकसानाचे मूल्यमापन करावे व नुकसान सिद्ध झाल्यास नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पर्यावरणीय मंजुरीच्या अटींनुसार आवश्यक असलेली वृक्षलागवड प्रत्यक्षात करण्यात आली आहे का, याची सखोल पडताळणी करण्याबरोबरच परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कोळसा वॉशरीसाठी आवश्यक पर्यावरणीय परवानग्या, तिची कार्यपद्धती आणि पर्यावरणीय नियमांचे पालन याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र (सीटीपीएस) येथे पुरवठा होणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक स्तरावर शंका व्यक्त होत असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे विमला सायडिंगमधून पाठविण्यात येणाऱ्या कोळशाचे अधिकृत नमुने घेऊन शासनमान्य प्रयोगशाळेत स्वतंत्र तांत्रिक तपासणी करावी, जेणेकरून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सायडिंग परिसरात कोळशाची उघड्यावर हाताळणी, साठवणूक आणि वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग तसेच इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत की नाहीत, याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवणे, कोळशाची झाकून साठवणूक करणे, झाकलेल्या वाहनांद्वारे वाहतूक करणे तसेच पर्यावरणीय अटींचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
जनहित, पर्यावरण संरक्षण, शेतकऱ्यांचे हित आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच आवश्यक ती तातडीची उपाययोजना राबवावी, अशी विनंती दिनेश दादापाटील चोखारे यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे केली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






