Lloyds Metals Chandrapur Pollution impact on Wardha River and farms

लॉयड्स मेटल्समुळे वर्धा नदी प्रदूषित; बाधित शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 21, 2026

चंद्रपूर: Lloyds Metals Chandrapur Pollution चा फटका घुघुस आणि लगतच्या परिसराला बसला आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या विषारी रसायनांमुळे वर्धा नदीचे पाणी गंभीररीत्या प्रदूषित झाले आहे. उसगाव परिसरातील तब्बल १०० एकर शेतजमिनीतील पिके जळून खाक झाली आहेत. याप्रकरणी कारखान्याची पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. संजीवनी पर्यावरण संस्थेने आणि बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. कंपनीवर कडक कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (नागपुरात NGT बेंच सुरु करा – आमदार सुधीर मुनगंटीवार)

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, घुघुस एमआयडीसीमधील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. या कारखान्यातून २१ जुलै रोजी उसगाव नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक द्रव्ये सोडण्यात आली. हे रसायन थेट पुढे जाऊन वर्धा नदीला मिळत असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. याशिवाय, कारखान्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर घातक वायू हवेत सोडले जात असून पर्यावरण नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. उद्योगातील Electro Static Precipitator मधून निघणारी धूळ आणि डोलाचार नियमबाह्य पद्धतीने विकला जात असून तो पुन्हा कोळशात मिसळून जाळला जातो. यामुळे हवेतील प्रदूषकांची पातळी धोक्याच्या पातळीबाहेर गेली आहे.

Lloyds Metals Chandrapur Pollution: वर्धा नदीत सोडले विषारी सांडपाणी

सांकाळी आणि रात्रीच्या सुमारास कारखान्यातील हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवली जात असल्याचा धक्कादायक आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर आणि धूळ पसरून शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. उत्पादनाच्या प्रक्रियेत निघणारे ग्रीस आणि कोळसामिश्रित सांडपाणी सतत नाल्यात सोडले जात असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. शासनाची मंजुरी नसताना दुप्पट क्षमतेने उत्पादन घेतले जात असून, या माध्यमातून करोडो रुपयांचा उत्पादन कर आणि आयकर बुडवला जात असल्याचा दावाही संस्थेने केला आहे.

दुसरीकडे, उसगाव येथील बाधित शेतकरी मोहनदास राजुरकर, वामन राजुरकर, बंडू राजुरकर, रामरतन राजुरकर, सुधाकर ठाकरे, नितेश ठाउरी आणि कवडू कडपाइले या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कंपनीच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. उसगाव येथील भूमापन क्रमांक २५३, २५२, १८४, २५४ आणि १७४/२ अंतर्गत येणाऱ्या सुमारे १०० एकर शेतजमिनीचे कंपनीच्या रासायनिक सांडपाण्यामुळे व प्रदूषणामुळे अतोनात नुकसान झाले आहे. जुना बंधारा बंद करून नवीन बंधारा बांधल्यामुळे हे रासायनिक पाणी थेट शेतात शिरत असून पिके जळून खाक होत आहेत. यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून योग्य भरपाई व न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या संपूर्ण गैरप्रकारात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूर येथील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकारी संगनमत करून कंपनीला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी संस्थेने केला आहे. या अधिकाऱ्यांची उत्पन्न आणि मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तातडीने निलंबित करावे व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रजी यादव, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून लॉयड्स मेटल्सवर कायदेशीर कारवाई करावी आणि कंपनीची पर्यावरण परवानगी रद्द करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून केली जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment