घुग्घुस (चंद्रपूर): Lloyds Metals Pollution Case मध्ये घुग्घुस एमआयडीसी परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या लोह प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या घातक रसायनांमुळे उसगाव परिसरातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
वर्धा नदी आणि स्थानिक उसगाव नाला मोठ्या प्रमाणावर दूषित झाला आहे. संतप्त शेतकरी आणि पर्यावरण संस्थेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात दूषित पाणी टाकून आंदोलन केले. (हे हि वाचा – दीक्षाभूमीसाठी चंद्रपुरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा)
एमआयडीसी घुग्घुस येथील मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. या लोह-प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात घातक वायू, रासायनिक घनकचरा आणि जलप्रदूषण होत असून, यामुळे उसगाव व घुग्घुस परिसरातील शेकडो एकर सुपीक शेती उद्ध्वस्त झाली आहे. वर्धा नदी तसेच उसगाव नाला रासायनिक द्रव्यांमुळे कमालीचा दूषित झाला असून, याविरोधात संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले सह स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या गंभीर समस्येबाबत १६ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर कारखान्यातून बाहेर पडणारा घातक रासायनिक कचरा व दूषित पाणी ओतून संस्थेच्या वतीने जोरदार निदर्शने करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य; १०० एकराहून अधिक शेती बाधित
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी निवेदनात नमूद केले की, १८ ऑगस्ट रोजी कंपनीने उसगाव नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विषारी रासायनिक द्रव्य सोडले, ज्यामुळे सुमारे १०० एकराहून अधिक शेतजमीन पूर्णपणे नापीक झाली आहे. याशिवाय कंपनीकडून अनेक नियमबाह्य कामे सुरू असल्याचा आरोप करत १० गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने ईएसपी डस्टची (Dolachar) बेकायदेशीर विक्री, सायंकाळी व रात्रीच्या वेळी हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवणे, रात्रीच्या अंधारात ईएसपी डस्टची विल्हेवाट व वाहतूक करणे, सर्व प्रदूषण नियंत्रण यंत्रणा निकामी असणे, ग्रीस व कोळशामिश्रित सांडपाणी थेट नाल्यात सोडणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा दुप्पट उत्पादन घेऊन शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणे अशा गंभीर उल्लंघनांचा समावेश आहे.
MPCB अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप; चौकशीची मागणी
कारखान्याच्या या मनमानी कारभाराला पाठीशी घालणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांवरही संस्थेने गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अधिकारी कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करत असल्यानेच कंपनीवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अधिकारी तानाजी यादव, सुशीलकुमार राठोड, नंदकिशोर लोमटे व स्वप्निल लिंगडे यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहन
कंपनीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून तिची पर्यावरण परवानगी रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या २५ सप्टेंबर रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर बाधित शेतकरी आत्मदहन करतील, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात उसगाव येथील शेतकरी मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामन बापूजी राजूरकर, बंडू धोंडूजी राजूरकर, रामरतन बापूजी राजूरकर, सुधाकर मल्हारी ठाकरे आणि नितेश पांडुरंग ठाकरे सहभागी होणार असून, उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






