चंद्रपूर: Chandrapur Farmers Protest चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स कंपनीविरोधात उसगावचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. कंपनीच्या रासायनिक सांडपाण्यामुळे शेकडो एकर सुपीक शेती नापीक झाली आहे. (हे हि वाचा – भजे बनवून न दिल्याने पती संतापला)
या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात थेट दूषित पाणी फेकून निषेध नोंदवला. मागण्या मान्य न झाल्यास २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
लॉयड्स मेटल्सच्या रासायनिक कचऱ्यामुळे १०० एकर शेती नापीक
घुग्घुस येथील मे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या लोहखनिज प्रकल्पामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याचा आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कामावरून काढून मनमानी कारभार केला जात असल्याचा गंभीर आरोप करत उसगाव येथील शेतकऱ्यांनी थेट जिल्हा प्रशासनाचे दार ठोठावले आहे. कारखान्याच्या रासायनिक कचऱ्यामुळे तब्बल १०० एकर शेतजमीन नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचा संताप व्यक्त करत, येत्या २५ ऑगस्ट २०२६ रोजी मंगळवारी सकाळी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तत्पूर्वी संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात नाल्यातील रासायनिक घाण टाकण्यात आली.
उसगाव (ता. जि. चंद्रपूर) येथील शेतकरी मोहनदास धोंडूजी राजूूरकर, वामन बाबूजी राजूूरकर, बंडू धोंडूजी राजूूरकर, रामरतन बाबूजी राजूूरकर, सुधाकर मल्हारी ठाकरे, नितेश पांडुरंग ठावरी आणि कवडू गणपत अडबायले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीत कंपनीच्या मनमानीवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. मौजा उसगाव परिसरातील भूमापन क्रमांक २५३, २५२, १८४, २५३, २६३, २५५, १७४/२, २६२, २६०, २५०, २५१, ४४४, १८५ या हद्दीतील सुमारे १०० एकर सुपीक शेतजमिनीमध्ये लॉयड्स मेटल्स कंपनी जुना बंधारा बंद करून नवीन बंधाऱ्याद्वारे रासायनिक कचरा व विषारी द्रव नाल्यात सोडत आहे. कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या या घातक रसायनांमुळे शेतातील उभी पिके करपून शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होत असून अवजड वाहतुकीमुळे हवेचेही प्रचंड प्रदूषण होत आहे. नाल्यातील पाणी दूषित झाल्याने जनावरे आणि वन्यजीवांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर बनला असून हेच विषारी पाणी पुढे वर्धा नदीत मिसळत असल्याने लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीवरून काढल्याचा गंभीर आरोप
केवळ शेतीचे नुकसानच नव्हे, तर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांवर कंपनी प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. कंपनीत कार्यरत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत असून काहींना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या व्यवस्थापकांकडून दिल्या जात आहेत. याशिवाय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव आणि उपप्रादेशिक अधिकारी सुशिल कुमार राठोड हे कंपनी व्यवस्थापनाशी साटेलोटे करून नियमांचे उल्लंघन करत असल्याचा खळबळजनक आरोपही शेतकऱ्यांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नाल्याच्या पाण्यात विषारी द्रव्य मिसळल्याने त्याचे दुष्परिणाम शेतीवर होत आहे, याबाबत नाल्याच्या पाण्यासह राजेश बेले व उसगाव मधील शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ गाठले, तानाजी यादव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांच्या उत्तराला संतापून शेतकरी व राजेश बेले यांनी नाल्यातील रासायनिक घाण उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी तानाजी यवाद यांच्या कक्षात व कार्यालयात टाकत निषेध नोंदविला.
गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या शेतीच्या नुकसानीची तात्काळ भरपाई न मिळाल्यास आणि कंपनीच्या या मनमानी कारभारावर निर्बंध न घातल्यास न्याय न मिळाल्यामुळे शेतकरी कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम असून या संभाव्य उद्रेकामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






