चंद्रपूर: Say No to Drugs Chandrapur चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ राबविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील २०३ शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आले.
या मोहिमेत ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना नकार देण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम उत्साहात पार पडले. (हे हि वाचा – प्रदूषण अधिकाऱ्याच्या कक्षात फेकले दूषित पाणी)
७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थांना नकाराची शपथ
तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि भावी पिढीला व्यसनमुक्त करून एक सुरक्षित, निरोगी समाज घडवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील एकूण २०३ शाळा व महाविद्यालयांमध्ये “Say No to Drugs” (अमली पदार्थांना नकार) या व्यापक जनजागृती मोहिमेचे एकाच वेळी आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील तब्बल ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे कधीही सेवन न करण्याचा आणि नशामुक्त समाज घडवण्यासाठी सक्रिय पुढाकार घेण्याचा सामूहिक संकल्प केला.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेच्या घातक परिणामांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली. तसेच राजुरा येथील ऐतिहासिक शिवाजी हायस्कूलमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. चंद्रपूरच्या बी.जे.एम. कार्मेल अकॅडमी येथे स्वतः जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना शपथ दिली. यासोबतच शहरातील खत्री कॉलेज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा निर्धार केला.
“नशामुक्त युवा, सशक्त भारत” या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या मोहिमेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यापक जनआंदोलनाचे रूप धारण केले होते. या अभियानात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार, शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच आणि सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतः नशा न करण्याचाच नव्हे, तर आपले मित्र आणि कुटुंबातही जनजागृती करण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे येत्या काळातही अमली पदार्थांच्या तस्करांवर कठोर कारवाया करण्यासोबतच तरुणांमध्ये सातत्याने जनजागृती व प्रतिबंधात्मक उपक्रम राबवून चंद्रपूर जिल्ह्याला पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी ही मोहीम अविरत सुरू ठेवली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






