पोंभुर्णा / चंद्रपूर: Pombhurna Forest News पोंभुर्णा येथे वनविभागाच्या विश्रामगृहामागील तलावात एका चितळाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृतदेहाला तीव्र दुर्गंधी सुटेपर्यंत वनविभागाला याची कोणतीही चाहूल लागली नाही. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राखुंडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
स्वतःच्या विश्रामगृहामागील घटनेची चाहूल न लागल्याने आश्चर्य
वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून सध्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) सह विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे दावे केले जात आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान आणि वनविभागाची प्रत्यक्ष गस्त किती प्रभावी ठरत आहे, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोंभुर्णा येथील वनविभागाच्या विश्रामगृहाच्या अगदी मागील बाजूस असलेल्या तलावात एका चितळाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतदेहाला तीव्र दुर्गंधी सुटेपर्यंत वनविभागाला याची साधी चाहूलही लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (हे हि वाचा – प्रदूषण अधिकाऱ्याच्या कक्षात शेतकऱ्यांनी फेकले रसायनयुक्त दूषित घाण)
१८ ऑगस्ट रोजी पोंभुर्णा परिसरातील काही नागरिकांना वनविभागाच्या विश्रामगृहाजवळ असह्य दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. नागरिकांनी संशय आल्याने विश्रामगृहाच्या मागे असलेल्या तलावात पाहिले असता, तिथे एका चितळाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना दिली; मात्र माहिती देऊनही बराच वेळ जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.
रात्री सुमारे ७:३० वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रकाराबाबत News३४ ला थेट संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली. यानंतर तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) श्री. राखुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, आपल्याला काही वेळापूर्वीच या घटनेची माहिती मिळाली असून वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वनविभागाचे कर्मचारी नियमितपणे जंगलात गस्त घालत असल्याचा दावा करत असताना, थेट स्वतःच्याच विश्रामगृहाच्या पाठीमागील तलावात वन्यप्राण्याचा मृत्यू होऊन दुर्गंधी सुटेपर्यंत यंत्रणेला पत्ता न लागणे ही बाब वनविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे. या चितळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला—पाण्यात बुडून की शिकारीच्या अथवा विषबाधेच्या प्रयत्नातून—याचा सखोल तपास वनविभागाने निष्पक्षपणे करण्याची मागणी आता पोंभुर्णा परिसरातील वन्यजीवप्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






