मुंबई – Savli Elephant Attack Alert मुळे सावली तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. या परिसरात सुमारे २५ रानहत्तींचा कळप दाखल झाला आहे. (हे हि वाचा – नशेपासून समाज वाचविण्यासाठी संकल्प करा – आमदार जोरगेवार)
वाघ आणि इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली.
मंत्रालयातील दालन क्र. ५४० मध्ये ही बैठक पार पडली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली.
मंत्रालयातील दालन क्र. ५४० येथे वनमंत्री ना. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सावली तालुक्यातील रानहत्ती व हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस श्रीमती एन सी पांडे, उपसचिव वन विभाग,एम श्रीनिवास राव प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख,प्रवीण राजाराम मुंडे उपसचिव,आर एस रामानुजन मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर,प्रभुनाथ शुक्ला क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर ,संबंधित अधिकारी उपस्थित होते.
२५ रानहत्तींच्या कळपामुळे शेतीपिके आणि मालमत्तेचे मोठे नुकसान
सावली तालुक्यात दाखल झालेल्या रानहत्तींच्या कळपामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीपिके, मालमत्ता तसेच मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय परिसरात वाघ व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी वन विभागाने केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी भूमिका मांडली.
रानहत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल ड्रोन, जीआयएस, अत्याधुनिक निरीक्षण व इशारा प्रणाली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संवेदनशील भागांमध्ये गस्तीसाठी अधिक वाहने उपलब्ध करून देण्यासोबतच एलईडी टॉर्च, सर्चलाईट, इलेक्ट्रिक स्टिक आणि आवश्यक संरक्षणात्मक साधने वन कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
प्रशासन व वन विभागाच्या यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक पायाभूत सुविधा व कार्यालयीन व्यवस्था विकसित करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून वन्यप्राण्यांच्या हालचालींचे त्वरित निरीक्षण, माहितीचे विश्लेषण आणि धोक्याची पूर्वसूचना देणारी सक्षम यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला.
वन्यप्राण्यांमुळे नागरिकाचा मृत्यू किंवा जीवितहानी झाल्यास संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम कोणताही विलंब न करता उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.
वनमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
आ. मुनगंटीवार यांच्या मागण्यांची दखल घेत वनमंत्री ना. गणेशजी नाईक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियमित देखरेख ठेवणे, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, स्थानिक नागरिकांना आवश्यक सूचना देणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपलब्ध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






