चंद्रपूर: Chandrapur Minor Missing Cases समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाली आहेत. पोलीस प्रशासनाने अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हे नोंदवले आहेत. सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी तातडीने शोधमोहीम राबवत आहेत. (हे हि वाचा – पालकांची चिंता वाढली, गोंडपिपरी तालुक्यात २ मुले बेपत्ता)
पहिली घटना पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ११वीच्या वर्गात शिकणारी एक अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघाली. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. नातेवाईक, तिच्या मैत्रिणी तसेच कॉलेजमध्ये विचारपूस केली असता ती तेथे पोहोचलीच नसल्याचे समोर आले. आसपासच्या अनेक गावांमध्ये शोध घेऊनही तिचा काहीच पत्ता लागला नाही. कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून तिला पळवून नेल्याची शंका व्यक्त करत पोंभुर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दुसरी घटना राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. इयत्ता ८वीत शिकणारी एक अल्पवयीन मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून निघाली. तिची आई कामावरून घरी परतली असता घराला कुलूप दिसून आले. घरात पाहणी केली असता मुलीचे कपडे आणि रोख ३०,००० रुपये गायब असल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी तिला बॅग घेऊन जाताना पाहिले होते. मात्र, शाळेत व बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा सर्व ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तिसरी घटना दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. १२वीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक १७ वर्षीय मुलगी रात्रीच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली. मध्यरात्रीच्या वेळी कुटुंबातील सदस्यांना ती खोलीत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर परिसर, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि नातेवाइकांकडे सर्वत्र शोध घेण्यात आला, परंतु तिचा कोणताही पत्ता लागू शकला नाही. अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी या बेपत्ता मुलांचा तातडीने शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






